इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणखी कठोर केले जात आहेत. बीजिंगमधील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या चाओयांग येथे सोमवारी सर्व रहिवाशांसाठी कोविड तपासणीच्या तीन फेऱ्या सुरू केल्या आहेत. अनेक महिन्यांपासून शांघाईमध्ये लॉकडाउन लावून नागरिकांना घरात कैद करण्यात आले असून, नागरिकांना खाण्या-पिण्याच्या वस्तूही मिळत नाहीये. चाओयांग येथील नागरिकांनाही हीच भीती सतावत आहे.
चाओयांग जिल्ह्यात जवळपास ३५ लाख नागरिकांची घरे आहेत. येथे व्यापारी केंद्रासह परदेशी दूतावास आणि गगनचुंबी चकचकीत इमारतीसुद्धा आहेत. येथे लाखो नागरिक काम करतात. शहरातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले, की येथील रहिवासी आणि चाओयांगमध्ये काम करणाऱ्या नागरिकांना या आठवड्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी तीन वेळा कोविड चाचणी करावी लागणार आहे. या नव्या आदेशामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी रविवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत जवळच्या मार्केटमध्ये गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी रांग लावली होती. लॉकडाउन लावण्यात आले तर घरात जबरदस्तीने राहावे लागेल अशी नागरिकांना भीती आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, अनेक बाजारपेठांमध्ये ताज्या भाज्या आणि मांस उत्पादनांचा तुटवडा निर्माण झाला होता. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा साठा संपल्याचेही डिलिव्हरी करणाऱ्या काही अॅप्सच्या संचालकांनी सांगितले. आठवडाभरात लॉकडाउन जाहीर होऊ शकते, अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा असे मेसेज कुटुंबीय आणि मित्रांमध्ये सोशल मीडियावर पाठवले जात आहेत
स्थानिक स्वयंसेवकांनी शांतता आणि शिस्त काय ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी बहुतांश शाळा, कार्यालये आणि बाजारपेठा खुल्या होत्या. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अहवालानुसार, बीजिंगमध्ये रविवारी १४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ११ रुग्ण चाओयांग जिल्ह्यातील होते. हा भाग बीजिंग शहराच्या मध्यभागी वसलेला आहे. तिथे चीनच्या वरिष्ठ नेतृत्वाचेही निवासस्थान आहे. चीनमध्ये रविवारी २०.,१९० हून अधिक रुग्ण आढळले होते. या बहुतांश रुग्णांमध्य कोणतीच लक्षणे दिसून आली नाहीत.