इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट आली असून अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतरही ही लाट आटोक्यात येत नसल्याने भीती निर्माण झाली आहे. कडक निर्बंध असूनही चीनमध्ये कोरोनाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. चीनमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे २६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. चीनी लस किती प्रभावी आहे हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तर, लॉकडाऊनला चीनी नागरिक वैतागले असून बिजींगमध्ये घराघरातून नागरिकांचा अक्षरशः ओरडण्याचा आवाज येत आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
चीन सरकारने बुधवारी सांगितले की, १२ एप्रिल रोजी कोरोनाचे २५ हजार १४१ नवीन लक्षणे नसलेले रुग्ण आढळले आहेत. तर लक्षणे असलेले ११८९ रुग्ण आढळले आहेत. त्याच दिवशी आधी लक्षणे नसलेली २२ हजार ३४८ प्रकरणे होती. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये चीनच्या शून्य कोविड धोरणावर टीका होत आहे. मात्र, चीन सरकारने त्याचा बचाव केला आहे. चीनने पत्रकारांना संबोधित करताना चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे प्रवक्ते म्हणाले, “चीनचे शून्य कोविड महामारीविरोधी धोरण विज्ञान आणि तज्ञांच्या मतानुसार लागू करण्यात आले आहेत. ही धोरणं जागतिक आरोग्य संघटनेच्या तत्त्वांवर आधारित आहेत.”
https://twitter.com/DrEricDing/status/1512974880463114241?s=20&t=KpMZKitXmLn9MjH2XrUC6w
भारतीय दूतावासाने शांघायमधील कॉन्सुलिंग सेवा बंद केली
कडक लॉकडाऊनमुळे शांघायमध्ये परिस्थिती बिकट आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासाने एक मोठा अपडेट दिला आहे. भारतीय दूतावासाने सांगितले की, शांघायमधील लॉकडाऊनमुळे भारताच्या वाणिज्य दूतावासाशी संपर्क होत नसल्याने शांघायमधील कॉन्सुलर सेवा प्रदान करता येणार नाही. याविषयी दूतावासाने भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.
अमेरिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावले
अमेरिकेने शांघायमधील आपल्या गैर-आपत्कालीन सरकारी कर्मचाऱ्यांना शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सूचना दिल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान अमेरिकन अधिकारी मात्र वाणिज्य दूतावासात कामावर असतील.