नवी दिल्ली – भारत आणि चीनदरम्यान तणाव कायम असून, तो कमी होण्याची कोणतीच चिन्हे दिसून येत नाहीयेत. चीनने पुन्हा भारताला उकसावण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने आता ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत. या ठिकाणांची चिनी शब्दात नावे ठेवली असून, चीनने अरुणाचल प्रदेशावर दावा आणखी बळकट करून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने जंगनान (चीनने अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटमधील जंगनान असे नाव दिले आहे.) मधील १५ ठिकाणांची नावे चिनी अक्षरे, तिबेट आणि रोमन वर्णमालेनुसार केली आहेत. ही १५ ठिकाणे अरुणाचल प्रदेशमधील आहेत. बदलण्यात आलेल्या १५ नावांपैकी आठ रहिवासी ठिकाणे, चार पर्वत, दोन नद्या आणि खिंडीचा समावेश आहे. चीनने दुसर्यांदा अरुणाचल प्रदेशाच्या ठिकाणांची नावे बदलली आहेत. यापूर्वी चीनने २०१७ मध्ये सहा ठिकाणांच्या नावांचे मानकीकरण केले आहे.
चीनने शन्नन प्रिफेक्चरच्या कोना काउंटीमधील सोंगकोजोग आणि डग्लुंगजोंग, निंगचीमधील मेडोग काउंटीमध्ये मणिगंग, ड्युडिंग आणि मिगपेन, न्यिंगचीच्या जायू काउंटीमधील गोलिंग, डंबा आणि शन्नान प्रिफेक्चरच्या लुंजे काउंटीमधील मोजागचे नावे बदलली आहेत. बीजिंगमधील चायना तिबेतोलॉजी संशोधन केंद्राच्या तज्ज्ञ लियान जियांगिमिन यांनी ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितले की, शेकडो वर्षांपासून उपलब्ध ठिकाणांच्या नावांबद्दल राष्ट्रीय सर्वेक्षणचाच भाग म्हणून या घोषणेकडे पाहिले जात आहे. भविष्यात या क्षेत्रामधील अधिक मानकीकृत ठिकाणांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.