इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संपूर्ण जगाला ‘अलीबाबा’च्या नावानं उद्योग सुरू करून आणि तो जबरदस्त यशस्वी करून दाखविणारा उद्योजक जॅक मा याला आता त्याच्याच कंपनीने घरी बसण्यास सांगितले आहे. ज्याच्या कल्पनेतून ‘अलीबाबा’ नावाने उद्योग सुरू झाला, त्याच्यावरच ही पाळी आल्याने चीनी धोरणांवर जगभरातून आक्षेप नोंदविले जात आहेत.
मुळात चीनबद्दल आक्षेप घेण्याला काही अर्थ नाही. कारण चीन हे पूर्णपणे स्वावलंबी राष्ट्र म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात बऱ्यापैकी यशस्वी ठरत आलं आहे. त्यांची अर्थव्यवस्था भारत किंवा अमेरिकेसाठी स्वतंत्र नाही. ती राज्यकर्त्यांच्या हाती आहे. जॅक मा यांनी अलीबाबाच्या माध्यमातून चीनी अर्थव्यवस्थेमध्ये काय योगदान दिलं, हे तर जगाला माहिती आहेच, शिवाय चीनी राज्यकर्त्यांनाही त्याची जाण आहे. मात्र ज्या क्षणी जॅक मा यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात विधानं करायला सुरुवात केली, त्याक्षणी त्यांची उलटी गिनती सुरू झाली. त्यांचं काम सुरू होतं, पण आतून सुरुंग लावला जातोय, हे लक्षात आलं नाही. आणि अलीकडेच अचानक एक दिवस त्यांच्याच कंपनीतील संचालक मंडळाने त्यांना राजीनामा देऊन कंपनी सोडण्यास सांगितले. खरं तर हालचाली सुरू असल्याचं त्यांना कळलं असेलच, पण आपणच दहा लोकांना सोबत घेऊन सुरू केलेली कंपनी आपल्यालाच एक दिवस घरचा रस्ता दाखवेल, याचा जॅक मा यांनी कधीच विचार केला नसेल.
अलीबाबा काय आहे?
संपूर्ण जगात अमेझॉन असले तरीही चीनमध्ये फक्त अलीबाबा चालतं. अर्थात अलीबाबाचं अस्तित्व जगभर आहे. पण चीनमध्ये दुसरं कुठलच शॉपिंग प्लॅटफॉर्म वापरलं जात नाही. एकप्रकारे मोनोपल्ली आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
जॅक मा यांचा प्रवास
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या सुरुवातीच्या काळातील चीनी तरुणांमध्ये जॅक मा यांचा समावेश होतो. त्यांनी तिथनं परत आल्यानंतर आपल्या काही मित्रांसोबत अश्याप्रकारची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मित्रांनी गुंतवणुक केल्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला.
नावाची कमाल
आपल्याला सर्वांना गोष्टीतला अलीबाबा माहिती आहे. जॅक मा यांनाही माहिती होता. पण, तो इतरांना माहिती आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांनी अमेरिकेतील एका हॉटेलमधल्या महिला वेटरला प्रश्न विचारला. त्यावर तिने अलीबाबा म्हणजे खुल जा सीम सीम, असे सांगितले. त्यानंतर जॅक मा यांनी रस्त्यावर भेटेल त्याला हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. जेव्हा त्यांना विश्वास बसला की अख्ख्या जगाला अलीबाबा हे नाव माहिती आहे, तेव्हाच त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.
राजीनाम्याची नामुष्की का?
जॅक मा यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात काही विधानं केली होती. त्याचवेळी त्यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेला बसलेले झटके जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात शी जिनपिंग व सरकारमध्ये रोष होताच. आता आपलं काही खरं नाही, हे कळल्यावर जॅक मा काही वेळ बाहेरच्या देशांमध्ये लपून राहिले. पण अखेर त्यांना कंपनी सोडावीच लागली.
China ANT Group Alibaba Jack Ma Company