इस्लामाबाद – एकीकडे भारताचे चीन आणि पाकिस्तानची गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण संबंध असताना चीन आणि पाकिस्तान यांची जवळीक मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. इतकेच नव्हे तर चीन सर्व क्षेत्रात पाकिस्तानला मदत करण्यात पुढाकार घेत आहे. यासाठी चिनी सैनिक, तंत्रज्ञ, डॉक्टर, अभियंते यांच्यासह विविध क्षेत्रातील चीनी नागरिक हे मित्र देश पाकिस्तानमध्ये सातत्याने राहत आहेत. ही संख्या येत्या ४ वर्षात ५० लाखांच्यावर जाईल, असा अंदाज आहे.
पाकिस्तानमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. चीन सरकार सातत्याने आपल्या लोकांना विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठवत आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानवर चीनचे पूर्ण नियंत्रण असेल, असे दिसून येते. आधी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या बांधकामाद्वारे आणि आता चीन-पाकिस्तान हेल्थ कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये आरोग्य सेवा बळकट करण्याच्या बहाण्याने चीन सरकार हे पाकिस्तानमध्ये आपले वर्चस्व वाढवत आहे.
चीन आपल्या ४० लाख नागरिकांना पुढील ४ वर्षांत म्हणजे २०२५ पर्यंत पाकिस्तानमध्ये बांधकाम आणि आरोग्य सेवांसाठी पाठवणार आहे. एचएसएचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. शहजाद अली खान यांनी मुलाखती दरम्यान सांगितले की, पाकिस्तानस्थित आरोग्य सेवा सुधारण्यासाठी तसेच चीनमधून येणाऱ्या कामगारांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, दोन्ही देशांची वैद्यकीय विद्यापीठे आणि चीन-पाकिस्तान अंतर्गत वैद्यकीय विद्यापीठे हेल्थ कॉरिडॉर संशोधन संस्थांमधील सहकार्य वाढविणार आहे.
पाकिस्तानी तज्ज्ञांना आधुनिक वैद्यकीय तंत्र तसेच पारंपारिक चिनी औषधांचे प्रशिक्षण चीनकडून मिळणार असून ते चीनमधील कोट्यवधी लोकांसाठी पसंतीचे उपचार आहे. त्यामुळे चीन अशा विविध प्रकल्पांद्वारे पाकिस्तान सरकारवर आपली पकड मजबूत करेल. चीन आधीच पाकमध्ये अनेक ट्रिलियन डॉलरचे प्रकल्प चालवत आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक भाग पाकव्याप्त काश्मीर व बलुचिस्तानमधूनही जातो, त्यावर भारत सातत्याने आक्षेप घेत आहे.