नवी दिल्ली – जगभरात कोरोना महामारी संकटाच्या काळात अनेक लहान मोठे देश आर्थिक संकटात सापडलेली असताना चीनमध्ये सध्या विजेचा तीव्र तुटवडा असून ब्रिटनमध्ये पेट्रोल टंचाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. एकीकडे चीनमधील वीज संकटामुळे सामान्य लोकांसह अनेक मोठ्या कंपन्यांच्या कामावर विपरित परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे ब्रिटनमधील पेट्रोल पंपाबाहेर प्रचंड गर्दी जमा होत असून अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल संपले आहे.
चीनच्या ईशान्य भागात प्रचंड विजेचे संकट असून हजारो नागरिक घरांमध्ये अंधारात राहत आहेत. तर अनेक कारखान्यांना काम बंद करावे लागले आहे. अनेक मॉल आणि दुकानेही बंद करण्यात आली आहेत. मात्र काही दुकाने मेणबत्तीच्या प्रकाशात सुरू आहेत. त्यामुळे ईशान्येकडील रहिवाशांनी सोशल मीडियाचा वापर करून सरकारला लवकरात लवकर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आवाहन केले.
लवकरच हिवाळा सुरू होणार असून अशा स्थितीत चांगचून, झेजियांग सारख्या अनेक भागात सरकारने वीज कपातीची घोषणा केली आहे. तसेच या प्रांतातील लोकांना त्यांच्या घरात जास्त विजेची उपकरणे वापरू नयेत, असे आदेश दिले आहेत. वीज संकटाचा चिनी कंपन्यांवर खूप वाईट परिणाम होत आहे. विशेषत: अॅपल आणि टेस्ला सारख्या दिग्गजांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. किंबहुना, या कंपन्यांच्या काही पुरवठादारांना त्यांच्या काही संयंत्रांचे काम विजेच्या कमतरतेमुळे थांबवावे लागले आहे.
चीनच्या उर्जा संकटामुळे आधीच कोरोना महामारीमुळे ग्रासलेल्या उद्योग क्षेत्रासाठी आणखी एक धोका निर्माण झाला आहे. यामुळे जागतिक व्यापार व पुरवठा साखळी प्रभावित होण्याची शक्यता आहे. तसेच ख्रिसमसच्या आधी स्मार्टफोन आणि अन्य उपकरणांसह वस्तूंची कमतरता हेऊ शकते. याशिवाय, जागतिक बाजारपेठेत कपडे, खेळणी आणि यंत्रसामग्रीच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो.
युरोपमध्ये ब्रिटन सारख्या देशात इंधन पुरवठ्यातील कमतरता दूर करण्यासाठी सरकारने लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने लष्कराच्या जवानांना या समस्येला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. ब्रिटनमध्ये इंधन टंचाईच्या भीतीमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
इंधन पुरवठ्यासाठी आपत्कालीन सेवा कामगारांना पुरवण्याची मागणी अनेक संघटनांनी केली होती. त्यानंतर सरकारने म्हटले की, त्याने ब्रिटिश सैन्याच्या चालकांना तयार ठेवले आहे. तसेच त्यांना आवश्यकते नुसार इंधन पुरवठा करण्यासाठी तैनात करता येईल. दरम्यान, शुक्रवारपासून अनेक पेट्रोल व गॅस स्टेशनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक रस्ते जाम झाले आहेत.
ब्रिटनमध्ये जवळपास दोन तृतीयांश स्थानकांवर इंधन नाही. अशा स्थितीत वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी स्थानकांवर नागरिक जमले आहेत. यूकेमधील शहरी भाग सर्वाधिक प्रभावित आहेत. तर सरकारचे व्यवसाय व्यवहार मंत्री क्वासी क्वार्टेंग म्हणाले की, ब्रिटनकडे मोठ्या प्रमाणात तात्पुरती इंधन टंचाई असून आम्हाला पेट्रोल पंपावर पुरवठा साखळीत येणाऱ्या समस्यांची जाणीव आहे आणि त्यांना प्राधान्याने सामोरे जाण्यासाठी पावले उचलत आहोत, असेही ते म्हणाले.
यूकेमध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर व ट्रक चालकांच्या कमतरतेमुळे इंधन पुरवठा संकट निर्माण झाले आहे. सध्या यूकेमध्ये दहा लाख ट्रक चालकांची कमतरता आहे. यामुळे अलीकडच्या काही महिन्यांत अनेक उद्योगांना अडचणी येत आहेत. यामध्ये सुपरमार्केट पासून फास्ट फूड चेन पर्यंतचा समावेश आहे.