इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनच्या सर्व इशाऱ्यांना न जुमानता अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या तैवान भेटीवर गेल्या आहेत. त्यामुशे जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे चीनने गुरुवारपासून तैवानच्या सीमेला घेराव घालून युद्ध पुकारण्याचे संकेत दिले आहेत. तर अमेरिका प्रत्येक परिस्थितीत तैवानसोबत असल्याचे सांगत आहे. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे तैवान पुढील युक्रेन बनू शकेल की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. असे झाले तर ही केवळ तैवानसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आणि तुमच्यासाठीही चिंतेची बाब असेल. याचे कारण तैवानची अर्थव्यवस्था आणि तेथील मोठे उत्पादन केंद्र हे आहे.
खरं तर, तैवान क्षेत्रफळाच्या दृष्टीने एक छोटासा देश आहे, परंतु तब्बल 600 अब्ज डॉलरच्या GDP सह, जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचा मोठा वाटा आहे. एवढेच नाही तर जगभरात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्स, कार आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी हे सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनाचे केंद्र देखील आहे. अलीकडे, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मार्क लिऊ म्हणाले की, जर चीनने तैवानवर हल्ला केला तर जगातील सर्वात प्रगत चिप कारखाना काम करू शकणार नाही. ते म्हणाले की आपण जागतिक पुरवठा साखळीवर अवलंबून आहोत. त्यामुळे हल्ला झाल्यास आम्हाला काम करणे कठीण होईल.
मार्क लिऊ यांचे हे विधान केवळ त्यांच्या कंपनीसाठी चिंतेचेच नाही तर संपूर्ण जगाला इशारा देण्यासारखे आहे. तैवानची गेल्या दोन दशकांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि सेमीकंडक्टर चिप्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि संरक्षण वस्तूंच्या उत्पादनात ते अग्रेसर आहे. मोबाईल, कार, टीव्ही यासह सर्व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये त्यांची विशेषतः गरज असते आणि जगभरातील अर्धसंवाहकांच्या उत्पादनात त्यांचा वाटा 50 टक्के आहे. यावरून तैवानवर हल्ला झाला तर जगाला किती जड जाईल हे समजू शकते.
मार्क लिऊ यांनी याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले की, तैवानवर हल्ला झाला तर कोणीही जिंकणार नाही तर संपूर्ण जग हरणार आहे. ते म्हणाले की, तैवानवरील हल्ल्यामुळे चीन, अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. ऍपल, मायक्रोसॉफ्ट सारख्या प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपन्या सेमीकंडक्टरसाठी तैवानवर अवलंबून आहेत. कोरोनाच्या काळातही जेव्हा चीनकडून सेमी कंडक्टर्सचा पुरवठा खंडित झाला होता, तेव्हाही तैवाननेच जगभरात पुरवठा सुरू ठेवला होता. युक्रेनमुळे जगभरात गव्हाचा प्रश्ननिर्माण झाला आहे. आता तैवानवर हल्ला झाला तर जगाला तांत्रिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
China America Taiwan Tension Near Future Impact