इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमध्ये कोरोना पुन्हा एकदा अनियंत्रित झाला आहे. सान्या शहरात लॉकडाउन लावण्यात आले आहे. हे एक मोठे पर्यटन शहर आहे. ज्याला चीनचे ‘हवाई’ म्हटले जाते. लॉकडाऊनमुळे शहरात तब्बल ८० हजार पर्यटक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहरात खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सान्या शहरात शनिवारी सकाळपासून सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून लोकांच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. सान्या शहराची लोकसंख्या दहा लाखांहून अधिक आहे. देशाच्या दक्षिण किनार्यावर वसलेले हेनान प्रांताची राजधानी सान्या हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने चीनसमोरील आव्हाने वाढली आहेत. आता शून्य कोविड धोरण आणि आर्थिक वाढ यांच्यात समतोल साधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. त्याच वेळी, या नवीन लॉकडाऊननंतर देशांतर्गत पर्यटनावर वाईट परिणाम होण्याची भीती आहे. १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या काळात सान्या शहरात एकूण ४५५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू झाल्यानंतर अचानक कोरोनाचा स्फोट होण्याची परिस्थिती निर्माण झाली. हैनान प्रांताचे आरोग्य आयोग ली वेंगज्यू यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितले की BA5.1.3 या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. प्रथमच स्थानिक पातळीवर हा विषाणूचा प्रकार सापडला आहे. त्याचा संसर्ग दर देखील खूप जास्त आहे.
परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळपासून निर्बंध लादले. सान्या शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांना परिस्थिती समजून घेऊन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेथील माध्यमांनुसार, सान्याचे उपमहापौर हे शिगांग म्हणाले की, सध्या सान्यामध्ये ८० हजाराहून अधिक पर्यटक मुक्कामी आहेत. सान्या सोडण्यापूर्वी लोकांनी ४८ तासांच्या आत त्यांच्या दोन पीसीआर चाचण्या निगेटिव्ह आल्याची खात्री करावी. दरम्यान, विमान तिकिटाचे दर अचानक वाढू लागले आहेत आणि शहरातील अडकलेल्या सर्व लोकांना कसे बाहेर काढता येईल हे स्पष्ट होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांचा जीव कासावीस झाला आहे.
China Again Lock Down 80 Thousand Tourist Stucked
Corona Virus Covid19 Sanya City