नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-भारतीय रेल्वेने महिलांसाठी अधिक सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) महिला कर्मचाऱ्यांना मिरची स्प्रे कॅन्सनी सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्राणघातक नसले तरीही एक प्रभावी सुरक्षात्मक साधन महिलांना तातडीने आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यास मदत करेल.विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी किंवा लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी याची खूप मदत होईल.
हा निर्णय रेल्वेच्या व्यापक सुरक्षाविषयक दृष्टीकोनाचा भाग असून, महिला कर्मचाऱ्यांना अधिक सक्षम बनवण्याच्या आणि प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. मिरची स्प्रे कॅनमुळे महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांना आत्मसंरक्षणाची अतिरिक्त सुविधा मिळेल, ज्यामुळे त्या संभाव्य धोक्यांना प्रतिबंध करू शकतील, छळाच्या घटनांना वेळीच आळा घालू शकतील आणि आपातकालीन परिस्थितींना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतील. हे विशेषतः दूरस्थ रेल्वे स्थानकांवर, धावत्या गाड्यांमध्ये आणि तातडीचा पाठिंबा मिळवणे सहज उपलब्ध नसलेल्या भागांमध्ये उपयुक्त ठरेल.
रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक, मनोज यादव, या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले, “हा उपक्रम पंतप्रधानांच्या महिलांना सक्षम बनवण्याच्या आणि सार्वजनिक ठिकाणे अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. महिलांसाठी प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेने सातत्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. आमच्या महिला आरपीएस कर्मचाऱ्यांनी ताकद, संवेदनशीलता आणि धैर्याचे प्रतीक म्हणून कार्य केले आहे. मिरची स्प्रे कॅनच्या सहाय्याने आम्ही त्यांचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढवत आहोत, तसेच एक स्पष्ट संदेश देत आहोत की प्रवाशांची सुरक्षा, विशेषतः महिलांची सुरक्षा, हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे.”
रेल्वे सुरक्षा दलात महिलांचा सहभाग वाढवणे हा देखील एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय आहे. आज, आरपीएफ मध्ये 9% महिला कर्मचाऱ्यांची भरती झाली असून हे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमधील (सीएपीएफ) सर्वाधिक प्रमाण आहे. यातील अनेक महिला ‘मेरी सहेली’ या विशेष सुरक्षा गटाचा भाग आहेत, ज्यांचे मुख्य उद्दिष्ट महिलांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे हे आहे. 250 हून अधिक ‘मेरी सहेली’ संघ दररोज सुमारे 12,900 महिला प्रवाशांशी संवाद साधतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि सुरक्षिततेची खात्री देतात.
महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांची भूमिका केवळ सुरक्षेपुरती मर्यादित नाही. त्या संकटात सापडलेल्या महिला प्रवाशांना मदत करण्याची जबाबदारीसुद्धा पार पाडतात. यात रेल्वे प्रवासादरम्यान प्रसूतीसाठी मदत करण्याचे अनेक प्रसंग समाविष्ट आहेत. ‘ऑपरेशन मातृशक्ती’ अंतर्गत, 2024 मध्ये रेल्वेतच 174 महिलांनी सुरक्षितपणे बाळंतपण पार पडले. जिथे आरपीएफ च्या महिला कर्मचाऱ्यांनी गोपनीयता, सन्मान आणि तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडली.
महाकुंभसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांमध्येही महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांनी पुरुष सहकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून कार्य केले. प्रयागराज येथे हजारो महिला यात्रेकरूंना मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आता, मिरची स्प्रे कॅनने सुसज्ज झाल्यामुळे महिला आरपीएफ कर्मचाऱ्यांमध्ये अधिक आत्मविश्वास, सामर्थ्य आणि तातडीने कृती करण्याची क्षमता निर्माण होईल. भारतीय रेल्वे महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि निर्भय प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि हा उपक्रम त्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे.