नवी दिल्ली – कोरोना विषाणूने आधी ज्येष्ठ नागरिक, नंतर मध्यमवयीन आणि हळूहळू १८ वर्षांवरील तरुणांना आपल्या कवेत घेतले. त्यादृष्टीने संबंधित लोकांसाठी लशीचे संशोधन होऊन त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. परंतु आता संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी लशीचे संशोधन करण्यात आले आहे. समाधानाची गोष्ट म्हणजे लशीचे परीक्षण अंतिम टप्प्यात आले आहे.
भारत बायोटेकच्या लहान मुलांसाठीच्या लशीचे ट्रायल अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी (२५ जुलै) दिली. या परीक्षणाचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. जायडस कॅडिला कंपनीने १२ ते १८ वर्षांच्या मुलांसाठीच्या लशीचे ट्रायल पूर्ण केले आहे. औषध नियंत्रण महासंचालक कार्यालयाकडून लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगीस विलंब लागणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर सप्टेंबरमध्ये मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे, असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. कोवॅक्सिन लशीचे ट्रायलही पूर्ण होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये लस उपलब्ध व्हायला हवी. त्यानंतर संसर्ग दर कमी असलेल्या ठिकाणी आवश्यक ती काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील.
टप्प्याटप्प्यात लशीचे परीक्षण
एम्समध्ये मुलांच्या लसीकरणाचे तीन टप्प्यात ट्रायल सुरू आहे. त्यामध्ये सर्वात आधी १२ ते १८ नंतर ६ ते १२ आणि शेवटी २ ते ६ वर्षांच्या मुलांना कोवॅक्सिनचे डोस दिले गेले आहेत. लशीच्या ट्रायलअंतर्गत दोन ते सहा वर्षांच्या पुढील आठवड्यात कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. एम्समधील लशीच्या ट्रायलचे मुख्य संशोधक प्रा. संजय राय यांनी ही माहिती दिली. १२ ते १८ आणि ६ ते १२ वर्षांच्या मुलांना लशीचे दोन्ही डोस आधीच देण्यात आले आहेत. लशीचे डोस खरेदी घेण्यासाठी लस उत्पादक कंपनी मॉडर्ना आणि फायझरसोबत केंद्र सरकारची चर्चा सुरू आहे. इतर देशांकडून त्यांना आधीच ऑर्डर मिळाल्याने भारतात या लशींना विलंब होऊ शकतो.