नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि वयस्कांना प्राधान्य देण्यात आले. परंतु सध्या यामध्ये बदल केला जात आहे. आता बहुतांश देश नवजात बालकांपासून ते १८ वर्षांच्या मुलांच्या लशीच्या परीक्षणावर भर देत आहेत. विविध देशांनी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांवर परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. भारतातही १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लशीचे परीक्षण सुरू करण्यात आले आहे.
सोमवारी (१४ जून) ६ ते १२ वर्षांच्या मुलांवर लशीचे ट्रायल करण्यासाठी त्यांचे स्क्रीनिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. स्क्रीनिंगदरम्यान जी मुले पूर्णपणे सुदृढ आढळली त्यांनाच लस देण्यात येणार आहे. त्यानंतर २-१२ वर्षांच्या मुलांवरही ट्रायल होणार आहे. देशातील विविध रुग्णालयांमध्ये २-१८ वर्ष वयोगटातील ५२५ मुलांवर कोवॅक्सिनचे ट्रायल होणार आहे. नवी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स रुग्णालयात आधीपासूनच प्रक्रिया सुरू झाली आहे. सरुवातीला एम्समध्ये १२-१८ वर्षांच्या जवळपास ३० मुलांची स्क्रीनिंग करण्यात आली होती. भारताशिवाय बहुतांश देशांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे.
अमेरिकेने मे महिन्यापासूनच प्रक्रिया सुरू केली असून, तिथे १२-१६ वर्ष वयोगटातील मुलांना फायझर लस दिली जात आहे. याच पद्धतीने युरोपीय देश हंगरी, इटली, जर्मनी, पोलंड, फ्रान्स, ब्रिटेन, कॅनडा, संयुक्त अरब अमिरात, इस्रायल या देशांनीही मुलांवर लशीचे ट्रायल करण्यास मंजुरी दिली आहे.
हंगरीमध्ये मे महिन्याच्या मध्यापासून १६-१८ वर्षांच्या मुलांना लस दिली जात आहे. असे करणारा हंगरी युरोपातील पहिला देश आहे. हंगरी सरकारने फायझर आणि मॉर्डना लशीला मान्यता दिलेली आहे. इटलीमध्ये १६ वर्षांहून अधिक वयाच्या मुलांवरही लशीचे ट्रायल सुरू झाले आहे.
युरोपमधील सर्वात मोठा देश जर्मनीने ७ जूनपासून १२-१६ वर्षांच्या मुलांना लस देण्यास सुरुवात केली आहे. परंतु येथे मुलांना स्वैच्छिक लस दिली जात आहे. सर्वच मुलांना लस दिली जावी असे सरकारचे प्रयत्न आहेत.
पोलंडमध्येही ७ जूनपासून १२-१५ वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये १२-१५ वर्षांच्या मुलांवर ट्रायलसाठी फायझर आणि बायोएनटेकच्या लशीला मंजुरी दिल्यानंतर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
फ्रान्समध्ये १५ जूनपासून १६-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तसेच १२-१५ वर्षांच्या मुलांना पुढील वर्षी लस देण्याचा विचार करत आहे. इस्रायल आधीपासूनच १६ वर्षांवरील मुलांना लस देत आहे. तेथे १२-१६ वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरणाचे काम सुरू झाले आहे. कॅनडामध्ये फायझर कंपनीच्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी लशीची खरेदी केली जात आहे.