नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या नव्या अवताराने आता लहान मुलांनाही बाधा पोहचविण्याचे काम सुरू केले आहे. देशभरात दिवसागणिक लहान बाधितांची संख्या वाढताना दिसते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये आतापर्यंत एकूण ७९,६८८ लहान मुले बाधित झाले आहेत. ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गुजरातमधील सुरत शहरात गेल्या शुक्रवारी १५ दिवसांच्या एका नवजात मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेत इतक्या कमी वयाच्या मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमधील ही एक घटना आहे. देशातील नवजात बाळांपासून ते १५ वर्षांच्या मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट घातक ठरत आहे. कोरोनामुळे सर्वात अधिक संसर्ग झालेल्या राज्यांमध्ये मार्च ते एप्रिलदरम्यान ८० हजार लहान मुले कोरोनाबाधित झालेले आहेत.
अशी आहे राज्यनिहाय लहान बाधितांची संख्या
महाराष्ट्र
१ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत राज्यात ६०,६८४ मुले संसर्गग्रस्त झाले आहेत. यामध्ये ९,८८२ मुलांचे वय ५ वर्षांहून कमी आहे. पहिल्या लाटेदरम्यान संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधित मुले बाधित झाली होती. मुलांमध्ये मल्टिसिस्टिम इंफ्लेमेट्री सिन्ड्रोमचे सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सध्या परिस्थिती आणखी चिघळली आहे.
छत्तीसगड
महाराष्ट्रानंतर छत्तीसडमध्ये सर्वाधित म्हणजेच ५९४० लहान मुले कोरोनाबाधित झाली आहेत. यामध्ये ९२२ मुले कमी वयाची आहेत.
उत्तर प्रदेश
येथे आतापर्यंत ३००४ मुले बाधित झाली आहेत. त्यामध्ये ४७१ मुले पाच वर्षांपर्यंतचे आहेत.
कर्नाटक
येथे पाच वर्षांहून लहान ८७१ रुग्णांसह आतापर्यंत एकूण ७३२७ मुलांना संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्ली
येथे ४ एप्रिलपर्यंत २७३३ मुले पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये ४४१ मुले पाच वर्षांहून लहान आहेत.
—
२८ हजार मुलांचे सर्वेक्षण
पाचव्या सिरो सर्वेक्षणात आढळले की, ५२ टक्के मुलांच्या शरीरात आतापर्यंत आढळत असलेल्या वयस्कांमधील अँटीबॉडीजप्रमाणेच अँटीबॉडी निदर्शनास आल्या आहेत. याचा अर्थ कोरोना संसर्गाचा परिणाम मुलांवरही दिसू लागला आहे. १५ ते ३० जानेवारीपर्यंत या सर्वेमध्ये ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या २८ हजार मुलांचा समावेश करण्यात आला होता.