नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जनहिताचा निर्णय म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU-1) चे सर्व शुल्क माफ केले आहे. या निर्णयामुळे सुमारे 6 कोटी मुलांना लाभ मिळणार आहे.
1 ऑक्टोबर 2025 पासून हे शुल्कमाफीचे नियम लागू झाले असून ते पुढील एक वर्षासाठी प्रभावी राहतील. पाच वर्षांखालील मुलांचा आधार नोंदणी करताना फक्त छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्मप्रमाणपत्र घेतले जाते. या वयात मुलांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे (आयरिस) बायोमेट्रिक परिपक्व नसल्याने त्यांची नोंद घेतली जात नाही.
सध्याच्या नियमांनुसार, मुलगा किंवा मुलगी पाच वर्षांचा झाल्यावर त्याचे किंवा तिचे बोटांचे ठसे, आयरिस आणि छायाचित्र अद्ययावत करणे बंधनकारक असते. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) असे म्हटले जाते. तसेच मुलगा किंवा मुलगी 15 वर्षांचा झाल्यावर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असते, ज्याला दुसरे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) म्हटले जाते.
पहिला आणि दुसरा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) अनुक्रमे 5 ते 7 आणि 15 ते 17 वर्षे वयोगटात केल्यास त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यानंतर प्रत्येक अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटसाठी 125 रुपये शुल्क आकारले जाते. या नव्या निर्णयामुळे आता 5 ते 17 वयोगटातील सर्व मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत झाले आहे.
अद्ययावत बायोमेट्रिक असलेल्या आधारमुळे मुलांचे दैनंदिन जीवन सुलभ होते. शाळेत प्रवेश, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी, शिष्यवृत्ती आणि थेट बँक खात्यात पैसे जमा (थेट लाभ हस्तांतरण ) योजनांचा लाभ घेणे यांसारख्या सेवांचा अखंडित वापर करता येतो. आईवडील किंवा पालकांनी आपल्या मुलांचे किंवा पाल्यांचे आधार बायोमेट्रिक तातडीने अद्ययावत करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.