नागपूर – आधार कार्ड हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा बनला आहे. कोणतेही शासकीय काम असो किंवा अन्य महत्त्वाचे काम असो, यासाठी आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकालाच आधारकार्डची आवश्यकता असते. लहान मुलाचे आधार कार्ड बनवायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे हवी आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.
भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (यूआयडीएआय) या आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे की, बाल आधार बनवण्यासाठी लहान मुलाचे जन्म प्रमाणपत्र किंवा पालकांपैकी एकाचे आधार कार्ड आवश्यक आहे आणि सोबत हॉस्पिटलमधून मिळालेल्या डिस्चार्ज स्लिपची आवश्यकता आहे. यावरून हे स्पष्ट होते की, पालकांना लहान मूलाचे आधार मिळवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र मिळण्याची अडचण येत असेल, तर ते संबंधित हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लिपच्या आधारावर कोणत्याही नवजात मुलासाठी तयार केलेले बाल आधार मिळवू शकतात.
पाच वर्षांखालील मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड बनवले जाते. त्याला बाल आधार म्हणतात. आता नवीन नियमानुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोणत्याही बायोमेट्रिक तपशीलाची आवश्यकता राहणार नाही. तथापि, एकदा मुलाचे वय पाच वर्षे पूर्ण झाल्यावर मात्र बायोमेट्रिक्स अद्ययावत करणे आवश्यक ठरते.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हटले आहे की, पाच वर्षांखालील मुलांची आधार नोंदणी करताना फिंगरप्रिंट आणि आयरीस स्कॅन केले जात नाहीत. मात्र त्याकरिता फक्त एक फोटो पुरेसा आहे. मुलाचे वय पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहे. आधार कार्ड मध्ये १२ अंकी ओळख क्रमांक आहे. तसेच आजच्या काळात सर्व प्रकारच्या महत्वाच्या सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक ठरणारे आहे.