मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला आता बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठीचे संख्याबळ नक्कीच सत्ताधारी गटाकडे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, उद्धव यांनी यापूर्वीच राजीनामा देण्याची दोनदा तयारी केल्याचे सांगितले जाते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे यांना त्यापासून परावृत्त केले. आता बहुमत चाचणीच्या तोंडावर असा प्रश्न उपस्थित होत आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा यापूर्वीच द्यायला हवा होता का? शरद पवारांचे ऐकायला हवे होते की नाही?
महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिवसेनेचे नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. बंडखोरीची घटना कळाल्यानंतर उद्धव यांनी रात्री उशिरा आपल्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे बैठक बोलावली. दुसऱ्या दिवशीही बैठक घेतली. आमदारांच्या कमी उपस्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे उद्धव यांना वाटू लागले. त्यामुळे उद्धव यांनी राजीनामा देण्याचे ठरवले होते, मात्र शरद पवारांनी त्यांना सामोरे जाण्यास सांगितले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि जनतेशी संवाद साधला होता. त्यानंतर ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधून बाहेर पजत मातोश्री गाठले. त्यानंतरही उद्धव यांना फेसबुकवर राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करायचा होता. परंतु पवार यांनी ठाकरे यांना थांबण्यास आणि घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, असेही सांगितले.
महाविकास आघाडी भाजपविरुद्धच्या लढाईत एकत्र लढणार असल्याचेही चित्र दिसत होते. त्यानंतरही ठाकरे यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु मुख्यमंत्रीपदावर राहून उद्धव यांनी चूक केली असावी, असे एका वर्गाचे मत आहे. त्यात राष्ट्रवादी आघाडी घेत असल्याचेही दिसून आले.
एका विश्वसनीय वृत्तानुसार असे समजते की, उद्धव यांचे एक निष्ठावंत म्हणतात की, उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याप्रमाणे ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता. यामुळे बंडखोरांना चांगला संदेश तर मिळाला असता, तसेच नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला असता. परंतु आता त्याऐवजी उद्धव वेगळ्याच वादात सापडले आहेत. बंडखोर आमदारांचा विश्वास गमावल्यानंतरही ते पुन्हा सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दीर्घ राजकीय युद्धासाठी जर राजीनामा दिला असता तर पक्षाचे मनोबल उंचावले असते.
बंडानंतर ४८ तासांच्या आत उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिसा असता तर बंडखोर गटासह त्यांना समर्थन देणाऱ्या भाजपचाही पर्दाफाश झाला असता. हा सगळा तणाव ठाकरे यांनी निर्माण केल्याचे काँग्रेसच्या काही नेत्यांचे खासगीत मत आहे. काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, उर्वरित आमदारांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या, अशी उद्धव यांची पहिली प्रतिक्रिया होती, ते आक्रमकपणे बोलले आणि त्याचा अनेकांना राग आला. तसेच खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर सेनेतील अनेक नेते खुष नाहीत.
Chief Minister Uddhav Thackeray Resignation correct timing Maharashtra Political Crisis