मुंबई – राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. बरोबर दोन वर्षांपूर्वी पहाटेच्या सुमारास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे सोशल मिडियात विविध पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ अजित देसाई हे हृदयरोग तज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.
अशा आहेत चर्चा
सोशल मिडियात व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता पदभार काही जणांकडे दिला जाण्याची शक्यता आहे. त्यात उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये अडीच-अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपदही यानिमित्ताने भूषविले जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.
शिवसेना नेत्यांचे स्पष्टीकरण
महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उत्तम कार्य करीत आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. उद्धव यांची प्रकृती उत्तम आहे. येत्या काही दिवसातच ते पुन्हा सेवेत रुजू होतील. त्यातूनच या अफवा आणि चर्चांना उत्तर मिळेल. काही जण मुख्यमंत्र्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे निमित्त साधून घाणेरडे राजकारण करीत असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.
शिंदे यांच्या कार्यालयाचा खुलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहे. याचनिमित्ताने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
मुख्यमंत्रीपदाच्या कारभाराबाबत नगरविकास विभागाकडून अधिकृत खुलासा करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये कुठलेही तथ्य नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजेस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती शिंदे यांच्या कार्यालयाने यापूर्वीच केली आहे.