मुकुंद बाविस्कर, मुंबई
आजारपण हे काही कोणाला सांगून येत नसते, त्यामुळे सर्वसामान्य माणूस तसा आजारी पडू शकतो तसेच राजकीय आणि अन्य क्षेत्रातील मोठा व्यक्ती देखील आजारी पडू शकतो किंवा रुग्णालयात दाखल होऊ शकतो. मात्र त्यामुळे लगेच त्याची चर्चा होते. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने राज्याच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
यापुर्वीही आपल्या देशात पंतप्रधान असो एखादा मुख्यमंत्री, ते आजारी पडल्यानंतर त्याची खूप चर्चा झाले होती, खुद्द देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे सुद्धा आजारी असताना अशाच प्रकारची चर्चा झाली, तेव्हा त्यांनी खुलासा केला होता की, मी ठणठणीत आहे देशाची जनता माझी काळजी घेईल, विरोधकांनी काळजी करू नये.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेची शस्त्रक्रिया नुकतीच झाली आहे. गेल्या ४५ दिवसांपासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. विरोधक आता याला मुद्दा बनवत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आजारावर राजकारण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असेच होत आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. मध्य प्रदेशातील कैलास जोशी असोत, उत्तर प्रदेशातील रामप्रकाश गुप्ता असोत किंवा तामिळनाडूतील जयललिता असोत, या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री असताना या आजारावर बरेच राजकारण केले होते. त्यातील काही निवडक अशी 5 उदाहरणे पाहू…
कैलास जोशी
आणीबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळवून कैलाश जोशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला सर्वकाही ठीक होते, परंतु काही महिन्यांनंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. एका गूढ आजारामुळे त्यांना खूप झोप येऊ लागली होती. असे म्हटले जाते की ते दिवसातून चक्क 20 तास झोपत असत. कोणी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले तर कर्मचारी सांगत की, मुख्यमंत्री झोपले आहेत. असाही एक किस्सा आहे की, एकदा पंतप्रधान मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते.
जोशी त्या कार्यक्रमाला येणार होते, पण मुख्यमंत्री झोपी गेले. जोशींची झोप वृत्तपत्रांमध्ये मथळे बनवू लागली. त्यानंतर एका व्यक्तीने बातमीचे पेपर कटिंग करून उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. याचिकेत मुख्यमंत्री जोशी यांना अपात्र ठरवून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत जोशींना विचारले असता ते म्हणायचे की, त्यांच्यावर कोणी जादूटोणा केला आहे. विरोधकांच्या सततच्या दबावामुळे अखेर कैलास जोशी यांना राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर काही दिवसांतच जोशी पूर्णपणे बरे झाल्याचे बोलले जात आहे.
राम प्रकाश गुप्ता
उत्तर प्रदेशचे 19 वे मुख्यमंत्री राम प्रकाश गुप्ता यांच्या प्रकृतीबाबत अनेक कहाण्या आहेत. गुप्ता दि.12 नोव्हेंबर 1999 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि 28 ऑक्टोबर 2000 पर्यंत या पदावर राहिले. तेव्हा त्यांचे वय 76 वर्षे होते. त्याला स्मृतिभ्रंश झाला होता, असे सांगितले जाते. तेव्हा त्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. राम प्रसाद यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनीही प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्ये द्यायला सुरुवात केली. त्यानंतर जंबो कॅबिनेटचे युग आले.
गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात 90 हून अधिक मंत्री होते. त्यांचे एक मंत्री प्रेम प्रकाश सिंह म्हणाले होते, ‘असा विसराळू मुख्यमंत्री असेल तर राज्यात काहीही होऊ शकते.’ बसपा प्रमुख मायावती यांनीही राम प्रसाद गुप्ता यांच्या वेगवेगळ्या विधानांचा खरपूस समाचार घेतला आणि म्हणाल्या, ‘गरीब लोक हे गुप्ता यांना काही काम सांगायचे ते नेहमी विसरायचे?’
नवीन पटनायक
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या प्रकृतीशी संबंधित किस्सेही खूप प्रसिद्ध आहेत. पटनायक 2000 पासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या काही वर्षांत पटनायक आजारी असल्याची बातमी ओडिशामध्ये पसरली होती. यामुळेच नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या पटनायक यांना अखेर आपली तब्येत उत्तम असल्याचे सांगण्यासाठी व्हिडिओ जारी करावा लागला.
ही गोष्ट सन 2019 ची आहे. त्यानंतर अचानक पटनायक आजारी पडल्याची बातमी राज्यभर पसरली. लवकरच त्यांची बहीण गीता मेहता त्यांचा राजकीय वारसा सांभाळणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. अखेर पटनायक यांना माध्यमांसमोर यावे लागले. आधी त्यांनी बहीण गीता राजकारणात येण्याची शक्यता खोडून काढली आणि नंतर व्यायाम करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करून त्यांची तब्येत दाखवली. नंतर त्यांनी याबाबत माध्यमां समोरही त्याचा उल्लेख केला. भाजपच्या एका कथित नेत्याने माझ्या आजाराबाबत अफवा पसरवल्याचे सांगितले.
जयललिता
सन 1991 मध्ये जयललिता यांनी प्रथमच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्या पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्या पहिल्यांदा 1991 ते 1996, दुसऱ्यांदा 2001, त्यानंतर 2002 ते 2006, 2011 ते 2014 आणि शेवटच्या वेळ म्हणजे 23 मे 2016 ते 5 डिसेंबर 2016 या कालावधीत मुख्यमंत्री होत्या. गेल्या दोन वर्षांपासून जयललिता खूप आजारी होत्या. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा झटकाही आला होता. यादरम्यान त्यांच्या आजाराबाबत वेगवेगळ्या अफवा येत होत्या. दरम्यान, त्यांची तब्येत सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, मात्र दि. 5 डिसेंबर 2016 रोजी अचानक त्यांचे निधन झाले. आजही त्यांचा मृत्यू आणि आजारपण एक गूढच आहे. सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
ज्योती बसू
सन 1977 मध्ये ज्योती बसू यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे बसू हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. देशातील कोणत्याही राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यानंतर त्यांचा तो विक्रम सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी मोडला . विशेष म्हणजे बसू 1977 ते 2000 पर्यंत मुख्यमंत्री होते. वास्तविक बसूंना पंतप्रधान व्हायचे होते.
सन 1989, 1990 आणि पुन्हा 1996 मध्ये त्यांना पंतप्रधानपदाची ऑफरही आली होती, पण प्रत्येक वेळी त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने ही ऑफर नाकारावी लागली. 2000 मध्ये ज्योती बसू यांची प्रकृती ढासळू लागली. विरोधकांनीही हा मुद्दा बनवला आणि शेवटी नोव्हेंबर 2000 मध्ये बसू मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले. दि. 17 जानेवारी 2010 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी ज्योती बसू यांनी अखेरचा श्वास घेतला.