इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय आणि साहिबगंज मतदारसंघाचे आमदाराचे प्रतिनिधी पंकज मिश्रा यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडक कारवाई करत आहे. ईडीने पंकज मिश्रा, दाहू यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या 37 बँक खात्यांमधील तब्बल 11.88 कोटी रुपये जप्त केले आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणी तपास यंत्रणेने पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई केली आहे.
बेकायदेशीर उत्खनन आणि टोल प्लाझा निविदांच्या कामात कथित अनियमितता प्रकरणांच्या चौकशीचा एक भाग म्हणून साहिबगंज, बरहैत, राजमहल, मिर्झा चौकी आणि बरहरवा यासह 19 ठिकाणी छापे टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, झारखंडमधील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित दोन वेगवेगळ्या मनी लॉन्ड्रिंग चौकशीत गेल्या दोन महिन्यांत 36 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त करण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्याने आणखी सांगितले की, या छाप्यांमध्ये कथित बेकायदेशीर खाणकामातून मिळालेल्या 100 कोटी रुपयांच्या उत्पन्नाची माहिती देखील समोर आली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणात कथित अवैध खाणकामाशी संबंधित रोख रकमेची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण या वर्षी मे महिन्यात IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईशी संबंधित आहे.
ईडीने तेव्हा चालू असलेल्या मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून पूजा सिंघल, तिचा व्यावसायिक पती आणि इतरांवर मे महिन्यात छापे टाकले होते.
झारखंडच्या खाण सचिवपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या IAS पूजा सिंघल यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्य सरकारने त्यांना निलंबित केले होते. सिंघल आणि त्यांच्या पतीशी संबंधित असलेल्या सीए सुमन कुमार यांनाही एजन्सीने अटक केली आणि एकूण 19.76 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
तसेच यापूर्वी, 8 जुलै रोजी ईडीने अनेक कागदपत्रे आणि 5.34 कोटी रुपये रोख जप्त केले होते. त्याच वेळी, अंमलबजावणी संचालनालयाने झारखंडमध्ये 17 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. तसेच पंकज मिश्रा यांच्याविरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंगशी संबंधित नवीन प्रकरणात ईडीने छापा टाकला होता.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटचे राजकीय प्रतिनिधी पंकज मिश्रा यांचा संताल भागात दबदबा आहे, त्याद्वारे या परिसरात अवैध दगड उत्खनन, अवैध वाहतूक आदी प्रकार सुरू असल्याची माहितीही ईडीला मिळाली आहे. ते पैसा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असत असा आहे. 2020 मध्ये, पंकज मिश्रा विरुद्ध बरहदवा येथे निविदा वादात झालेल्या भांडणात एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये साहिबगंज पोलिसांनी पंकज मिश्रा यांना क्लीन चिट दिली होती.
Chief Minister Hemant Soren Close Persons ED Raid Seized crore rupees