नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरी व ग्रामीण भागातील युवक-युवतींना उद्योग व्यवसायात स्वयंरोजगार व रोजगारास चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
ही योजना कायदेशिररित्या पात्र असणारे उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायासाठी असून योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्षे पुर्ण अधिकतम मर्यादा 45 वर्ष आहेत. तर अनुसूचित जाती,जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे शिथिल करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी रु.10 लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण तर 25 लाखावरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आहे. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
योजनेत उत्पादन व्यवसायासाठी उदा.बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रिकेशन इत्यादीसाठी 50 लाख व सेवा उद्योग व्यवसायासाठी उदा. सलून, रिपेअरिंग व्यवसाय, ब्यूटीपार्लर इत्यादीसाठी 10 लाख पर्यतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. या योजनेत अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के अनुदान व ग्रामिण भागासाठी 35 टक्के अनुदानासाठी पात्र असेल. त्यासाठी त्यांना स्वगुंतवणूक 5 टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रगवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी 15 टक्के व ग्रामिण भागासाठी 25 टक्के अनुदानासाठी पात्र असेल या लाभार्थ्यांना 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने https://maha-cmegp.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावे. अर्ज करतांना अर्जदारास स्वत:चा फोटो, आधार कार्ड, अधिवास दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, मार्कशिट, पॅन कार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला व वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन पुर्ण भरलेले हमीपत्र ही कागदपत्रे अपलोड करावी.
ज्या सुशिक्षीत बेरोजगार युवक- युवतींना नविन व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी वेबसाईटवर अर्ज करावा किंवा योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ रुम नंबर 28, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे कार्यालयीन कामाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचा (दूरध्वनी क्रमांक 02564-210048/210055 ) व ईमेल आयडी [email protected] असा आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र ,नंदुरबार यांनी केले आहे.