मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशभरातील कोणत्याही राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होते. तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री यांची त्या निवडणुकीत कसोटी लागते. कारण त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा कामाची जणू काही परीक्षाच असते. सुमारे पाच वर्षात जनतेसाठी कामे केली तर ते मुख्यमंत्री निश्चितपणे निवडून येतात. परंतु नागरिकांचा रोष असेल किंवा जनभावना त्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असेल तर त्यांना पराभवाला देखील सामोरे जावे लागते. सध्या पाच राज्यातील निवडणुका झाल्या असून काही विद्यमान मुख्यमंत्री आणि अनेक माजी मुख्यमंत्र्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वीदेखील देशभरातील अनेक राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये तत्कालीन विद्यमान मुख्यमंत्री यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, असे दिसून येते.
उत्तराखंडमध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करत आहे. मात्र, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी येथून निवडणूक हरले आहेत. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद कापरी यांनी त्यांचा जवळपास पाच हजार मतांनी पराभव केला. यासोबतच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. चन्नी पंजाबमधील दोन विधानसभा जागांवरून निवडणूक लढवत होते आणि दोन्ही जागांवरून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विद्यमान मुख्यमंत्री निवडणुकीत पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक राज्यांचे मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
ममता बॅनर्जी
मार्च २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला होता. तथापि, त्यांची पारंपारिक विधानसभा जागा भाबनीपूर होती, जिथून त्यांनी २०१६ मध्ये निवडणूक लढवली आणि ती जिंकली. मात्र नंदीग्राममधून भारतीय जनता पक्षाचे शुभेंदू अधिकारी यांना त्यांच्याच घरात आव्हान देण्यासाठी त्या निवडणूक लढवण्यासाठी गेल्या होत्या. जिथे त्यांना १७०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
सिद्धरामय्या
सन २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांनाही निवडणूक पराभवाला सामोरे जावे लागले होते. सिद्धरामय्या यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती, त्यात एका जागेवर त्यांचा पराभव झाला. चामुंडेश्वरीमध्ये त्यांचा ३६,०४२ मतांनी पराभव झाला. पण बदामीची जागा केवळ १,६९६ मतांनी निश्चितपणे जिंकली होती.
हरीश रावत
हरीश रावत हे २०१४ ते २०१७ पर्यंत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. सन २०१४ मध्ये धारचुला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून रावत मुख्यमंत्री बनले. २०१७ च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
रघुवर दास
सन २०१९च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री रघुवर दास यांचा येथे पराभव झाला. त्यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. रघुवर दास यांचा माजी मंत्री आणि अपक्ष उमेदवार सरयू राय यांनी १५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
प्रेमकुमार धुमल
यापूर्वी हिमाचलचे मुख्यमंत्री असलेले प्रेम कुमार धुमल हे देखील मुख्यमंत्री म्हणून निवडणूक हरलेल्या व्यक्तींमध्ये आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाला होता. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना सुजानपूर मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसचे प्रतिस्पर्धी राजेंद्र सिंह राणा यांनी जवळपास ३,५०० मतांनी पराभव केला.