मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रकृतीच्या कारणावरून त्यांचा राजीनामा घेण्यात येईल, असे सांगितले जात असताना येत्या दोन-तीन दिवसांत राज्याचा खरा मुख्यमंत्री कळेल, अशी देखील वाच्यता सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे प्रकृतीच्या कारणावरून स्वत:च्या मुळगावी गेले आहेत. सातार जिल्ह्यातील दरे गावी त्यांचा मुक्काम आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांत झालेले अनेक कार्यक्रम टाळलेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उधाण आले आहे. अशात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकृतीच्या कारणावरून शिंदे यांचा राजीनामा घेण्यात येईल, असा अंदाज वर्तविला आहे. तर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी लवकरच राज्याचा खरा मुख्यमंत्री कळेल असे सांगत गुढ वाढविले आहे.
आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांचा राजीनामा घेत अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी असावी असा कयास असू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांचा सहभाग अत्यंत कमी होता हे निदर्शनास आणून देत सीएमओ कार्यालय आणि प्रवक्ता यांच्यात त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवरून परस्परविरोधी विधान केली जात असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ
राज्यात शिंदे गट आणि भाजप सरकारला अजित पवारांच्या रुपाने नवा साथीदार लाभला आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री बदलण्यात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘येत्या दोन-तीन दिवसात कळेल की खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असे भाकीत आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ठाकरेंच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.