मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला. याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे याप्रसंगाची सर्वाधिक चर्चा सध्या राज्यभरात होत आहे. ती म्हणजे, शिंदे यांच्या निवासस्थानी भिंतीवर असलेल्या फोटोंची. शिंदे यांच्या निवासस्थानी भिंतीवर तीन फोटो आहेत. त्यात मध्यभागी मोठा फोटो हा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. तर डाव्या बाजूला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तर उजव्या बाजूला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. विशेष म्हणजे शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आहे. ४० पेक्षा अधिक सेना आमदारांनी बंड केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार करुन आता शिंदे हे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढला आहे. अशातच आता शिंदे यांच्या घरातील या फोटोंमुळे ठाकरे कुटुंबियांविषयीचा त्यांचा आदर दिसून येत आहे. दरम्यान, त्यांच्याविषयी एवढा आदर आहे मग बंडखोरी का केली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1544252354404397056?s=20&t=l8v1JT6D8fpPduGuIacxJw
Chief Minister Eknath Shinde Residence Photo