मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात तब्बल ४० शिवसेना आणि १० अपक्ष आमदारांना आपल्या पाठिशी घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी त्यांचे बळ आणि राजकीय उंची सगळ्यांना दाखवून दिली आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ उडाली आहे. दिवसागणिक सेनेच्या विविध नेत्यांचे समर्थन त्यांना मिळत आहे. त्यामुळेच शिंदे गट सशक्त होताना दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आता काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडे नजर वळविली आहे.
भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून तब्बल २०० आमदार मतदान करतील, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गट यांच्याकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळेच शिंदे यांनी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे समर्थनासह त्यांना फोडण्यावर लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिशन-२००’ हातात घेतले आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटाकडे एकूण १७० आमदार आहेत. शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यापासून आमदारांची संख्या १८५ वर गेली आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले २०० आमदारांचे लक्ष्य गाठण्यासाठी एकनाथ शिंदे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना गृहित धरत असल्याचे सांगितले जाते. शिंदे यांना आश्वासन पूर्ण करण्यासाठी १५ आमदारांच्या मतांची गरज आहे.
एकनाथ शिंदे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडू शकतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वपक्षीय आमदारांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, शिवसेना-भाजप युतीच्या सरकारसह महाविकास आघाडी सरकारमध्येही त्यांनी सर्वपक्षीय आमदारांची कामे तातडीने मंजूर केली. गेल्या दोन ते अडीच दशकांपासून त्यांचे सर्वच राजकीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यातच आता ते मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या संबंधांचा वापर करुन आणखी १५ आमदार फोडणार असल्याचे सांगितले जाते. त्यात ते यशस्वी झाले तर सहाजिकच भाजपमध्येही त्यांचे वजन वाढणार आहे. आता त्यादृष्टीने कितपत यशस्वी होतात हे येत्या दोन दिवसातच समजणार आहे.
Chief Minister Eknath Shinde Nationalist Congress Party MLA Strategy Politics