नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांना या भागातील खड्डेमय रस्त्याचा मोठा सामना करावा लागला. खुद्द राज्याच्या प्रमुखाचेच रस्त्यावरून वाहने जाताना हे हाल होतात तर सर्वसामान्यांची काय कथा? अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.
मुळात मराठवाड्यातील अनेक रस्ते रस्त्यांची कामे बाकी असून ज्या रस्त्यांची कामे झाली ते रस्ते रस्त्यांचे अत्यंत दुरवस्था झाली आहे, तसेच पूर्वीच्या रस्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनांना कसरत करावी लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनांच्या ताब्याला देखील खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागला.
राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धापूर वळण रस्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा कळमनुरीकडे जात असतांना खड्डेमय रस्त्यात ताफा अडकला. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व गुत्तेदाराचा हलगर्जीपणामुळे २ किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी २५ ते ३० मिनिटांचा वेळ लागला. ताफा अडकल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर आले आहेत. नांदेडचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हिंगोलीकडे अर्धापूर वळण रस्त्याने निघाले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा ताफा सायंकाळी सहाच्या सुमारास खड्डेमय रस्त्यात अडकला. अचानक उद्भवलेल्या समस्येने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. या ताफ्यात खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री संजय राठोड आदींचा समावेश होता.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते पहिल्याच पावसात चिखलमय झाले आहेत. रस्त्यात मोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागाला जोडणारे अनेक रस्त्यांची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
महाराष्ट्र, तेंलगणा व कर्नाटकाच्या सीमेवरील असलेल्या तालुक्यातील अनेक गावांचा रस्त्यांची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली आहे. तालुक्याला जोडणाऱ्या तमलूर, हिप्परगा, नरंगल, सुंडगी या गावजवळील रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून या गावांचे रस्ते जीवघेणे झाले आहेत.
सध्या शेती कामाला वेग आले आहे. शेतीउपयोगी वस्तू घेऊन याच खड्डेमय रस्त्यावरून शेतकऱ्यांसह वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन अवघड प्रवास करावा लागत आहे. यामुळे शारीरिक व आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे लवकरात लवकर स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड, हिंगोली जिल्हा दौऱ्यात फेरबद्दल झाले होते. मुंबईत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेगाने हालचाली सुरू असताना एवढ्या घाई गडबडीत खासदार हेमंत पाटील आणि कळमनुरी विधानसभा आमदार संतोष बांगर यांच्या प्रेमापोटी मुख्यमंत्री नांदेड – हिंगोली दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांनी नागरिकांना संबोधित करताना येथील स्थानिक प्रश्न शंभर टक्के सोडवणार असल्याची ग्वाही दिली.
शेवटी खड्ड्यातून कसा तरी मार्ग काढत ताफा अर्ध्यातासाने पुढे निघाला. दोन किमीच्या अंतर पार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अर्धातास लागल्याने ताफ्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांसह रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदारबद्दल नाराजी वाढली आहे. रस्त्याच्या कामाचे साहित्य ठेवण्यासाठी गुत्तेदाराने चक्क राष्ट्रीय महामार्गच निवडला. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विविध कामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. याचा फटका इतर वाहन चालकाबरोबर मुख्यमंत्र्याच्या ताफ्यालाही बसला. नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून नाहक त्रास होत आहे.
Chief Minister Eknath Shinde Nanded Tour Bad Experience