ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मध्यरात्री झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला शिंदे यांनी रात्री एक वाजेच्या सुमारास हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करीत उपस्थितांमध्ये जोश भरला तसेच अनेकांवर टीका केली.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुमारे १५ दिवसांपूर्वी सरकार स्थापन झाल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, तर दुसरीकडे काही आमदारांना मंत्री होण्याची भलतीच घाई झालेली दिसून येते. विशेषतः बंडखोर आमदारांमधील संजय शिरसाठ, संतोष बंगार, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील, दीपक केसरकर आदींनी मंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले दिसून येते.
परभणीचे आमदार संतोष बांगर यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांचा सत्कार करीत शक्ती प्रदर्शन केले, मंत्री होण्यासाठी त्यांची ही दडपड चाललेली दिसून येते, त्यानंतर लगेचच औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी देखील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई गाठत चक्क मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचा सत्कार करीत शक्ती प्रदर्शनाचा घाट घातला, यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील संजय शिरसाट यांना महाविकास आघाडी मधून बाहेर पडण्यासाठी कशी घाई झाली होती, याचा किस्सा सांगितला. तसेच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दादरच्या रविंद्र नाट्य मंदिर मध्यरात्रीच्या सत्काराप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी बंडखोरी दरम्यान, नेमके काय काय घडले यावर भाष्य केले. मध्यरात्री असा मेळावा कुणी घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. आमचे जे काही चालले, त्यात संजय शिरसाट पुढे होते, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांचे सकाळपासूनच समर्थक मुंबईकडे रवाना झाले होते. सायंकाळी हे सर्वजण मुंबईत पोहोचले परंतु कार्यक्रमातील व्यस्ततेमुळे अखेर मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी शिवसेना नगरसेवक, तालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, महिला आघाडी तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबई येथे आले होते. परंतु मंत्री पदासाठी मुख्यमंत्र्यांसमोर आमदार संजय शिरसाठ यांचे हे एक प्रकारे शक्ती प्रदर्शनात होते अशी चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आज एकदम ओके वाटत आहे. आजचा मेळावा ऐतिहासिक आहे आणि आम्ही ऐतिहासिकच कामगिरी केलीये, संजय शिरसाट मला नेहमी विचारायचे साहेब कधी करणार? कसे करायचे ? मी त्यांना संयमाचा सल्ला दिला. म्हटले बाबा जरा थांब !, मात्र सहा महिन्यांत चित्र बदलत गेले. सगळीकडे आम्हाला घातक चित्र दिसू लागले. आम्ही खूप प्रयत्न केले मात्र काहीच उपयोग झाला नाही.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधला. सर्व निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळत होता. आमचे आमदार निधीपासून वंचित होते. राष्ट्रवादी काँग्रेस सगळीकडेच आमदारकीची तयारी करते, शिवसेना चार नंबरवर गेली. आम्ही हिंदुत्वाचा झेंडा फडकवल्यावर तुम्ही कॅबिनेटमध्ये नामांतराचा निर्णय घेतला, असे म्हणत शिंदेंनी हल्लाबोल केला. शिवसेना वाचवण्यासाठी ही क्रांती आहे असेही ते म्हणाले. सकाळी टीव्हीवर बोलणाऱ्यांनी हे बघावे जरा, असे म्हणत संजय राऊतांनाही एकनाथ शिंदे यांनी डिवचले कोर्टात चार मागण्या केल्या आणि म्हणतात कोर्टात आमचा विजय झाला, असेही ते शिंदे म्हणाले.
Chief Minister Eknath Shinde Midnight Program Speech Politics