नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्रीच राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. शिंदे गटात सामील होणाऱ्या तब्बल १२ खासदारांसह ते आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यातील संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यासंदर्भातही ते विधीज्ञ आणि अन्य मान्यवरांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे सांगितले जाते.
शिवसेनेमध्ये बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वप्रथम सेनेचे ४० आमदार फोडल्यानंतर त्यांनी आता खासदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. सेनेचे तब्बल १२ खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तुमच्याकडे किती खासदारांचे पाठबळ आहे असे शिंदे यांना विचारले असता त्यांनी १८ खासदारांचा आकडा सांगितला आहे. शिवसेनेचे सध्या १९ खासदार आहेत. त्यामुळे एक खासदार वगळता तब्बल १८ खासदार आपल्याकडे असल्याचा दावा करुन शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळेच आता शिवसेनेचे विधानसभेपाठोपाठ संसदेतील गटनेते पदही जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. १९ पैकी दोन तृतीयांशपेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा आपल्याला असल्याचे सांगत शिंदे हे या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदी यांच्या समोर हजर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटातील सहभागी १२ खासदारांपैकी २ खासदारांना केंद्रात मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद असल्याचे बोलले जात आहे.
Shivsena Rebel Chief Minister Eknath Shinde in Delhi Tour Politics