मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन कारभार सुरू केला. मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्याने सहाजिकच मुख्यमंत्री या नात्याने शिंदे यांना तब्बल ३९ दिवस मंत्रालयात विविध फाईलींचा निपटारा करणे भाग पडले. त्यातच त्यांना विविध कार्यक्रमांना हजेरी लावणे, विविध दौरे, दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या. या सर्व बाबीत त्यांनी गेल्या ३९ दिवसात ३९९ फाईल्सचा निपटारा केला आहे. जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होत नाही तोवर शिंदे यांना अशाच प्रकारे कामाचा उरक ठेवावा लागणार आहे.
1 जुलै ते अगदी आतापर्यंत म्हणजे 8 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 399 फाईल्सचा निपटारा केला आहे. विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्तीमधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्रिमंडळासमोर आणावयाचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागांच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रितीने झाली पाहिजेत तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात येत आहेत.
Chief Minister Eknath Shinde File Clearance in 39 Days
Mantralay CM Maharashtra Government