मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल पाचव्यांदा दिल्लीवारी केली. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करुन शिंदे हे पहाटे ४ वाजता औरंगाबादला परतले आहेत. यासंदर्भात विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. भाजपने शिंदे यांची झोप उडविली असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर होते. मात्र, त्यांना भाजप श्रेष्ठींकडून तातडीने फर्मान आल्याने औरंगाबाद दौरा अर्धवट सोडून ते तडकाफडकी दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर पहाटे चार वाजता शिंदे हे औरंगाबादमध्ये परतले असून आज सकाळपासून त्यांनी पुन्हा त्यांचे नियोजित कार्यक्रम सुरू केले आहेत.
दिल्ली दौऱ्यात नक्की काय झाले, काय निर्णय झाला याबाबत कुठलीही माहिती शिंदे किंवा भाजपने दिलेली नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींची असल्याचे सांगितले जात आहे.
३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महिना झाला तरी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोघांचेच मंत्रिमंडळ आहे. महिन्याभरात राज्यातील कारभार विस्कळीत झाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उत्तर देता देता शिंदे आणि फडणवीस यांच्या तोंडाला जणू फेस येत आहे. त्यातच शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेमुळे भाजप श्रेष्ठींनी अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. म्हणूनच मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिला जात नसल्याचे सांगितले जात आहे. १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या दिल्लीवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Chief Minister Eknath Shinde Delhi Visit Amit Shah Meet Politics