मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळ्यांना समान न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या विशेष आधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सरकारच्या वतीने राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आवाजी मतदानाने मतदान करण्यात आले. सरकारच्या वतीने राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेना-भाजपचे सर्व सदस्य तसेच सहयोगी पक्षांना राहुल नार्वेकर यांनाच मतदान करण्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. त्यानुसार ही सर्व मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 सदस्यांची मतं मिळाल्याने बहुमताने अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी त्यांची निवड झाल्याची घोषणा करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना त्यांच्या स्थानापर्यंत घेऊन गेले.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1543536362447843328?s=20&t=UePRHnJX657f9r6QbMEy6g
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. आधी ते शिवसेनेत होते, आता भाजपमध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे. पक्षाची हीच भूमिका प्रवक्ते म्हणून मांडताना त्यांनी वेळोवेळी आपल्यातील हे गुण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
https://twitter.com/mieknathshinde/status/1543515621467758592?s=20&t=UePRHnJX657f9r6QbMEy6g
महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अनेक उत्तम अध्यक्षांची मोठी परंपरा आहे. कै. ग. वा. माळवणकर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, अरुण गुजराती, दिलीप वळसे पाटील, हरिभाऊ बागडे आणि नाना पटोले यांच्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे या विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळं महत्त्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा आपल्या खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली असून ते ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील असा विश्वास यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. आज अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर उद्या बहुमत चाचणीला देखील सरकारला सामोरे जायचे आहे त्यात देखील हे सरकार निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
Chief Minister Eknath Shinde After win of Rahul Narvekar