मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय विमानाचा वापर राज्यातील प्रमुखांसाठीच असला तरीही त्याच्या वापरावरून मोठा वाद महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण बघितला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात या विषयावरून चांगलीच जुंपली होती. मात्र आता हा वाद कायमचाच संपुष्टात आणणारे नियम करण्यात आले आहेत.
राज्यात २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेचे युती सरकार आल्यानंतर शासकीय विमान वापरासंबंधीचे १९६७ चे नियम कालबाह्य ठरवून १३ फेब्रुवारी २०१५ रोजी नवीन नियम लागू करण्यात आले. या नियमात राज्य शासनाच्या ताफ्यातील विमान व हेलिकॉप्टर वापरण्याकरिता मुख्यमंत्र्यांना प्राधान्य देण्यात आले होते. राज्यपालांना शासकीय विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र आता राज्य सरकारने हा नियम रद्द केला आहे. यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर शासनाच्या ताफ्यातील विमान वापरता येणार आहेच, शिवाय राज्यपालांनाही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. राज्यपालांना यापुढे शासनाच्या ताफ्यातील विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेण्याची गरज नाही, असे या नियमांत म्हटले आहे. राज्य अतिथी किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्ती, केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने शासकीय विमान, हेलिकॉप्टर वापरण्यास मुभा देण्यात आली होती. ती नव्या नियमात कायम ठेवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्र्यांचीही नावे जोडली
जुने नियम रद्द करून नवे नियम करताना यात उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. आता उपमुख्यमंत्र्यांनाही शासकीय विमान वापरण्याची मुभा असेल. शिवाय त्यांना त्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज असणार नाही, असेही यात म्हटले आहे. विमान वापरण्याच्या क्रमवारीत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा समावेश आहे.
कोश्यारींना विमानातून उतरावे लागले
११ फेब्रुवारी २०२१ रोजी शासकीय विमान वापरावरुन ठाकरे व तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात मोठा वाद झाला होता. राज्यपालांना शासकीय विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते. कोश्यारी यांना विमान वापरण्यास परवानगी न मिळाल्याने विमानातून खाली उतरावे लागले होते.
Chief Minister DYCM Benefit Government Helicopter
Maharashtra Politics Air Traffic Plane Governor