अगरतळा – सरकारी अधिकार्यांनी न्यायालयाच्या अवमाननेला न घाबरता काम केले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब देब यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ उडासा असून, तृणमूल काँग्रेससह इतर पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य देशासाठी लाजिरवाणे आहे, अशी टीका टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटरवर केली आहे.
त्रिपुरा येथील आयएस अधिकार्यांच्या एका परिषदेत ते बोलत होते. बिपलब देब म्हणाले, की न्यायालयाची अवमानना झाली आहे ही बाब अशा पद्धतीने मांडली जाते की जसा समोर वाघ बसला आहे. मी वाघ आहे. सरकार चालविणार्याकडेच सत्ता असते. संपूर्ण शक्ती लोकांकडे असते असा याचा अर्थ आहे. आमचे सरकार न्यायालयांनी नव्हे, तर लोकांनी बनविले आहे. न्यायालयाच्या अवमाननेच्या भीतीमुळे राज्याच्या माजी मुख्य सचिवांना कार्यमुक्त केले होते, असा उल्लेखही त्यांनी भाषणात केला.
यावर टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांनी बिपलब देब यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते ट्विटवर म्हणाले, बिपलब देब हे पूर्ण देशासाठी लाजिरवाणे आहेत. ते निर्लज्जासारखे लोकशाही आणि न्यायालयीन व्यवस्थेची खिल्ली उडवत आहेत. या अपमानास्पद वक्तव्याची दखल सर्वोच्च न्यायालय घेणार का?
अभिषेक बॅनर्जी यांच्या ट्विटवर बिपलब देब यांच्या ओएसडींनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय मिश्रा म्हणाले, की आपले फेक प्रोप्रागंडा पसरविण्याआधी तुम्ही पूर्ण भाषण ऐकले पाहिजे. तुम्ही सरकारी संस्थांचा किती सन्मान करतात हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे.
सीपीएम नेते पबित्र कार म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य राज्यघटना आणि न्यायालयीन व्यवस्थेवर एक प्रकारचा हल्लाच आहे. मुख्यमंत्रिपदावर असताना ते असे वक्तव्य करू शकत नाहीत. आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो. न्यायालयाने त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घ्यावी असे प्रयत्नही आम्ही करणार आहोत.