नाशिक – डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात हे संमेलन संपन्न होणार आहे. संमेलनासाठीच्या मंडप भूमीपूजनाचा सोहळा पार पडला आहे. तसेच, संमलेनाच्या उदघाटन आणि समारोपाला कोणते मान्यवर येणार हे सुद्धा निश्चित झाले आहेत.
उदघाटन आणि समारोपासाठी दिग्गज मान्यवरांच्या नावाची चर्चा सुरू होती. काही मान्यवरांनी होकार कळविला तर काहींनी नकार. तर, काही मान्यवरांनी त्वरीत प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नक्की कुठले मान्यवर येणार हे निश्चित होत नव्हते. अखेर आता स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनीच मान्यवरांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार, साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठी कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर हे मान्यवर राहणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. जयंत नारळीकर यांच्याकडे आहे. प्रथमच मराठी शास्त्रज्ञाकडे अध्यक्षपदाची धुरा जाणार असल्याने या संमेलनाकडून अनेकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, जेष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे उपस्थित राहणार असल्याचे स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी सांगितले. आहे. संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. विविध समित्यांच्या बैठका सुरू असून कुठलीही उणीव राहू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे.









