नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ हे गुरुवार दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता येवला येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुती घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा येवला लासलगांव विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी केले आहे.
याबाबत प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ हे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात त्यांनी हजारो कोटी रुपयांची विकास कामे करून येवला मतदारसंघाचा कायापायलट केला आहे. येवल्याला जलसंजीवनी देणारा मांजरपाडा-पुणेगाव दरसवाडी- डोंगरगांव कालवा, छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली मुक्तीभूमी यासह येवला मतदारसंघात अनेक महत्वपूर्ण प्रकल्प त्यांनी पूर्ण केले असून आज राज्यभरात त्यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा आहे. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी संपूर्ण मतदारसंघातील जनता त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. त्यामुळे पाचव्यांचा ते येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येवला शहरात सकाळी १० वाजता संपर्क कार्यालय येथून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता रॅलीला संपर्क कार्यालय येथून सुरुवात होऊन विंचुर चौफुली, फत्तेपूर नाका मार्गे येवला तहसील कार्यालयाच्या दिशेने रॅली पुढे जाईल. त्यानंतर महायुती घटक पक्षातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी एन्झोकेम हायस्कूल मैदान येथे भव्य सभा होऊन ते सर्वाना संबोधित करतील. यासाठी महायुती घटक पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा येवला विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी केले आहे.