नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नार-पार खोऱ्यातील अतिरिक्त पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी पार – गोदावरी ही एकात्मिक नदी जोड योजना राबविण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नार-पार या पश्चिमवाहीनी नदी खोऱ्यातील सर्व नद्या या सह्याद्री पर्वत रांगेत उगम पावून पुढे पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. नाशिक जिल्ह्यातील पूर्वेकडील येवला, नांदगाव व चांदवड तालुक्यांसह मराठवाड्यात कमी पर्जन्यमान असल्याने या भागात सतत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पूर्वेकडील दुष्काळी भागासह मराठवाड्यासाठी सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याच्या शाश्वत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
शासनाने दि.११ नोव्हेंबर २००० रोजीच्या शासन निर्णयानुसार पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या शक्याशक्यतेचा अहवाल तयार करण्यासाठी समन्वय समिती स्थापन केलेली होती. समन्वय समिती सप्टेंबर २००१ च्या अहवालानुसार उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी जे पाणी पुणेगाव धरणाजवळ उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ७५० घ.फु./प्र.से.इतक्या क्षमतेचा पुणेगाव ते कोल्ही असा उच्चस्तर कालवा काढून दिंडोरी, चांदवड, येवला, वैजापूर व गंगापूर तालुक्यातील कायमस्वरूपी अवर्षणप्रवण व दुष्काळी क्षेत्राला सिंचनाचा फायदा देता येईल. सदर कालव्यातून या अवर्षणप्रवण भागाच्या सिंचनासह छ. संभाजीनगर शहरातील भविष्यातील बिगर सिंचनाची पाण्याची गरज भागविण्यात यावी, अशी समन्वय समितीने शिफारस केलेली आहे.
नदीजोड प्रकल्पा संदर्भात दि. १६/०१/२०१२ रोजी प्रधान सचिव (जसं) यांचेशी मुख्य अभियंता (जसं) व सहसचिव, मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक व सहाय्यक मुख्य अभियंता, कोकण प्रदेश यांच्या समवेत मंत्रालयात झालेल्या चर्चेत ५०० मी. पातळीवरील उपसा नियोजन करण्याचे ठरले. त्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांचे पत्र दि. ०४.०८.२०१२ अन्वये पार- गोदावरी नदीजोड योजना क्र. ३ व ४ या प्रकल्पाचा पूर्व संभाव्यता अहवालास मान्यता प्राप्त असून पार खोऱ्यातील उपसा योजना क्र. ३ अंतर्गत १२ धरणे (५०० मी. तलांकावरील) बांधण्याचे प्रस्तावित असून धरणामध्ये ७५% विश्वासार्हतेने उपलब्ध होणारे ९४.३७ द.ल.घ.मी. पाणी पुणेगाव धरणाजवळ टाकण्याचे प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे.
तसेच उपसा योजना क्र. ४ अंतर्गत ७ धरणे (५०० मी. तलांकावरील) बांधण्याचे प्रस्तावित असून धरणामध्ये ७५% विश्वासार्हतेने उपलब्ध होणारे ८९.१२ द.ल.घ.मी. पाणी करंजवण धरणाजवळ टाकण्याचे प्रस्तावित आहे असे एकूण १८३.४९ द.ल.घ.मी. (६.४७ टीएमसी) गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे पूर्व संभाव्यता अहवाल नुसार प्रस्तावित आहे. पार-गोदावरी नदीजोड योजना क्र.३ या प्रकल्पास शासन निर्णय क्रमांक प्रमा २०१२/५५२/(२०५/२०१२) जसंअ दिनांक १८/०९/२०१२ अन्वये प्रशासकिय मान्यता प्राप्त आहे. त्यामध्ये या प्रकल्पास ९४.३६ द.ल.घ.मी. पाणी उपसा करण्याची तरतूद आहे. तसेच पार-गोदावरी नदीजोड योजना क्र.४ या प्रकल्पास शासन निर्णय क्रमांक प्रमा २०१२/५५१/(२०४/२०१२) जसंअ दिनांक १९/०१/२०१३ अन्वये प्रशासकिय मान्यता प्राप्त आहे. त्यामध्ये या प्रकल्पास ८९.१२ द.ल.घ.मी. पाणी उपसा करण्याची तरतूद असल्याचे म्हटले आहे.
पार-गोदावरी नदीजोड योजना क्र. ३ व ४ या प्रकल्पांसाठी सर्वेक्षण व अन्वेषण कामाच्या प्रशासकिय मान्यतेनुसार एकूण १८३.४९ द.ल.घ.मी. पाणी मंजूर करण्यात आले होते. मुख्य अभियंता कोकण प्रदेश मुंबई यांनी दि. २३ डिसेंबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये पार- गोदावरी नदी जोड प्रकल्पास एकूण ८५.४१ द.ल.घ.मी. पाणी वापराचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्रदान केले आहे. त्यानुसार पार-गोदावरी नदी जोड योजनेतील पाणी उपलब्धता प्राप्त धरणांचे प्रकल्पस्थळी आवश्यक येवा राखीव ठेवणे आवश्यक होते, तथापि, मागील काळात यातील काही पाणी नार- गिरणा नदी जोड योजनेसह इतर योजनांसाठी उपलब्ध करून दिले आहे. आता नार पार, अंबिका, औरंगा खोऱ्यामध्ये उरलेले सर्व पाणी एकत्र करून हे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी एकात्मिक नदी जोड प्रकल्प राबविण्याची नितांत आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
पार गोदावरीसाठी या पर्यायांवर विचार व्हावा
१) पार गोदावरी नदीजोड योजना क्र.३ व ४ या योजनेला २०० मी. तलांक पर्यंत पाणी उपसा करण्याची परवानगी बाबत
पार गोदावरी नदीजोड योजनांप्रमाणे तापी उपखो-यात पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा ही नदीजोड योजना सुध्दा प्रस्तावित आहे. नार-पार-गिरणा नदीजोड योजनेतील सावरपाडा व उखेडमल ही दोन धरणे पार खोऱ्यात येतात. या दोन धरणाचे एकुण ८८.५३ द.ल.घ.मी. (३.१२ टीएमसी) पाणी वळविणे प्रस्तावीत आहे व त्यास मुख्य अभियंता जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र दि. २९.०७.२०२२ रोजी प्रदान केलेले आहे. सदर दोन धरणाला पाणी उपसा करण्याची परवानगी ३५० मी. तलांक पर्यंत आहे. व त्याच खोऱ्यात असलेल्या पार गोदावरी नदीजोड योजनेला ५००मी. तलांक पातळीवरील पाणी उपसा करण्याची परवानगी आहे. तथापि समन्वयसमितीच्या अहवालात ५०० मी. तलांकावरील पाणी व ५०० मी. तलांकाखालील पाणी गोदावरी व तापी खोरे वापरतील असे नमुद आहे.
भारतात इतर राज्यात जसे नर्मदा नदीचे पाणी इंदौर शहरास ४२० मी. उपसा करून पुरवले आहे. तेलंगणा राज्यात ६२४ मी उंची पर्यंत पाणी उपसा करून कालेश्वरम प्रकल्प कार्यान्वित केला आहे. पार गोदावरी नदीजोड योजना क्र.३ व ४ या योजनेला २०० मी. तलांक पर्यंत पाणी उपसा करण्याची परवानगी दिल्यास तुटीच्या गोदावरी खोऱ्यात जास्तीचे पाणी उपलब्ध होऊ शकते.
गोदावरी खोऱ्याला लगतचे पार खोरे आहे व गिरणा खोऱ्याला नार, अंबिका व औरंगा हे लगतचे खोरे आहे. नार-पार-गिरणा नदीजोड योजनेत पार खोऱ्यातील घेण्यात आलेल्या उखेडमल व सावरपाडा या दोन धरणा ऐवजी मुख्य अभियंता, जल विज्ञान व धरण सुरक्षितता नाशिक यांच्या अभ्यासानुसार गिरणा खोरेस नजीक असलेल्या अंबिका व औरंगा उपखो-यात शिल्लक असलेल्या अनुक्रमे ६४.४१ व ३९.२८ द.ल.घ.मी. असे एकूण १०३.६९ द.ल.घ.मी. पाण्यातून पर्यायी योजना घेतल्यास उखेडमल व सावरपाडा या धरणांचे एकूण ८८.५३ द.ल.घ.मी. (३.१२ टीएमसी) पाणी पार खोरेस नजीक असलेल्या गोदावरी खोऱ्यात वापरणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल.
२) पार तापी नर्मदा आंतरराज्य नदीजोड योजना रद्द झाल्याने अतिरिक्त उपलब्ध होऊ शकणारे पाणी पार गोदावरीसाठी ठेवणे.
पार तापी नर्मदा आंतरराज्य नदीजोड योजनेचा अद्याप करार झालेल्या नसल्यामुळे या योजनेस प्रस्तावित केलेल्या ४३४ द.ल.घ.मी. पाणी वापराचे नियोजन जलविज्ञान प्रकल्प, नाशिक यांनी केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार ४३४ द.ल.घ.मी.. पाण्यापैकी २७६.४४ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले. त्याकरिता मुख्य अभियंता, नदीजोड प्रकल्प समन्वय, नाशिक यांनी दि.१०.०९.२०२४ रोजी सचिव (लाक्षेवि) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पार तापी नर्मदा लिंक प्रोजेक्ट रद्द झाल्याने नार, पार, औरंगा व अंबिका खोरे मधील शिल्लक असलेले २७६.४४ द.ल.घ.मी मधील शिल्लक पाणी वाटपाबाबत शासनस्तरावरून धोरणात्मक निर्णय व्हावा अशी विनंती केली असल्याचे म्हटले आहे.
नार व पार खोऱ्यात तलांक पातळी ५०० मी. च्या वर व खाली असे एकूण मिळून १७२.७४ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे. त्यापैकी पार गोदावरी योजनेची तुट वजा जाता १७२.७४ -४०.३०-१३२.४४ द.ल.घ.मी. (४.६७ टीएमसी) नार व पार खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यासाठी राखीव ठेवल्यास आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे.
पार – गोदावरी नदी जोड योजना क्र. ३ व ४ चे एकूण ८५.४१ द.ल.घ.मी. (३.०१ टीएमसी) पाणी पार तापी नर्मदा लिंक प्रोजेक्ट मधील नार व पार खोऱ्यातील शिल्लक पाणी गोदावरी खोरेसाठी राखीव ठेवल्यास १३२.४४ द.ल.घ.मी. (४.६७ टीएमसी) पाणी गोदावरी खोऱ्यात येणारे एकूण पाणी २१७.८५ द.ल.घ.मी. (७.६८ टीएमसी) याप्रमाणे पार तापी नर्मदा लिंक प्रोजेक्ट मधील नार व पार खोऱ्यातील शिल्लक असलेले १३२.४४ द.ल.घ.मी. व पार गोदावरी नदीजोड योजना क्र. ३ व ४ चे एकूण ८५.४१ द.ल.घ.मी. असे एकूण २१७.८५ द.ल.घ.मी. (७.६८ टीएमसी) पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यासाठी राखीव ठेवल्यास गोदावरी खोऱ्यातील कायम स्वरूपी अवर्षण प्रणव व दुष्काळी नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगांव,दिंडोरी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यास सिंचनाचा लाभ होईल.
३) गुगुळ व पायरपाडा प्रवाही वळण योजना – गुगुळ व पायरपाडा प्रवाही वळण योजना राबवून या योजनांचे पाणी पुणेगाव धरणात वळवता येईल.
हे ७.६८ टीएमसी अधिक गुगुळ व पायरपाडा द्वारे वळविलेले पाणी मांजरपाडा बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आणता येईल. पुढे पुणेगाव दरसवाडी डावा कालवा आणि दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याद्वारे दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव आणि नारंगी सारंगी धरणातून वैजापूर गंगापूर तालुक्याला सिंचनाचा लाभ देता येईल. तरी, नार-पार खोऱ्यातील अतिरिक्त पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी पार-गोदावरी ही एकात्मिक नदी जोड योजना राबविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी असे तीन पर्याय छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे मांडले आहे.