नाशिक – महाराष्ट्राच्या सुधारणांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणा सातत्यपूर्ण करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, १ मे १९६० रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवली. तेव्हांपासून देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्र राज्याने नेहमीच सक्रीय सहभाग नोंदवला आहे. संत-महंत, ऋषिमुनीं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेवून प्राणांची पर्वा न करता अतोनात कष्ट, यातना सहन करणारे राज्यातील क्रांतीकारक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या समाजसुधारकांचे विचार आजही आपल्या प्रगतीसाठी प्रेरक ठरत आहेत.
मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र दिन कोरोना प्रतिबधांच्या सावटाखाली व मर्यादित स्वरूपात साजरा केला होता. परंतु आज ही परिस्थिती बदलून महाराष्ट्र दिनाचा हा दिवस निर्बंध मुक्त वातावरणात साजरा करण्याचे संपूर्ण श्रेय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी आवर्जुन नमुद केले. राज्यात कुठलाही गरजू अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यकती काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या कुशल प्रशासनातून जिल्ह्यात व विभागात अनेक नाविण्यपूर्ण लोकोपयोगी संकल्पनांची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून नागरी सेवा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास तृतीय क्रमांकाचे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानतेचे राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान करण्यात आले असून त्यासोबतच संपूर्ण नाशिक विभागास 9 पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यासाठी सर्व अधिकारी व कार्यालयांचे अभिनंदन केले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना काळात निराधार झालेल्या बालकांसाठी शासकीय “मदतदूत” योजनेसाठी जिल्हाधिकारी यांचा विशेष पुरस्काराने तर पोषण आहारातील उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण पोलिसांनी कोरोनाकाळात घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. पोलीस आयुक्त, पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलात मोठ्या सकारात्मक घडामोडी घडत आहेत. पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ आणि पोलिस दलाचे मनोबल वाढविण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटीबद्ध असल्याचे ही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनामार्फत अनेकविध उपक्रम राबविण्याबारोबरच विधायक कामांच्या स्पर्धेमध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पिपळगांव बसवंत या ग्रामपंचायतीला पहिले ISO 9001 : 2015 मानांकन मिळाले असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेत चांदवड तालुक्यांतील शिरसाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनाचा पुरस्कार दिंडोरी तालुक्यांतील गोंडेगाव तर पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरणाचा पुरस्कार इगतपूरी तालुक्यांतील मोडाळे व नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीस पंतप्रधानांच्या हस्ते मिळाला असल्याचाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी आवर्जुन उल्लेख केला आहे.
शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हटले जाते. यानुसार शेतकरी राजाच्या सुखासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे. विशेष म्हणजे आजपासून राज्याचा कृषी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांच्या वितरणाचा सोहळा २ मे रोजी माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकाराने आपल्या जिल्ह्यात संपन्न होणार असल्याचे ही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात वैयक्तीक लाभाच्या योजना, सामुहिक लाभाच्या योजना तसेच आर्थिक विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. प्रामुख्याने विद्यार्थ्यासाठी मॅट्रीकपुर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना इत्यादीच्या माध्यमातून अर्थसहाय्य व आधार देण्याचे काम शासन करत आहे. शेतकऱ्यांना मुलभूत सेवा सुविधांसोबतच त्यांना महावितरणच्या माध्यमातून विद्युत पुरवठ्याचेही काम प्राधान्याने केले जाते. त्यात कृषिपंप विज धोरणांतर्गत ७६० कोटींची विजबिलामध्ये सूट देण्यात आली आहे. यात १ लाख ८३ हजार ४२१ शेतकऱ्यांनी आपली उर्वरीत थकबाकी भरून सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ७ हजार ३१० शेतकऱ्यांना शेतीपंपाकरिता वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध लोकसेवा देण्याकरिता आजपासून राज्यात तसेच जिल्ह्यात सेवाहमी कायद्यांतर्गत ३५ सेवा विद्यार्थ्यांसाठी तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या ७० सेवा अशा १०५ सेवा अधिसूचित करून त्या लागू करण्यात येत आहेत, अशी माहिती ही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेत १००८.१३ कोटी रूपयांचा निधी मिळणार असून याअंतर्गत सर्वसाधारण योजनांसाठी ६०० कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी ३०८.१३ कोटी व अनुसूचित जाती उपयोजनांसाठी १०० कोटींचा समावेश आहे. देवसाने माजंरपाडा वळण योजना ही पार खोऱ्यातील विनावापर अरबी समुद्राला जाऊन मिळणारे पाणी अडवून पूर्वेकडे वळविण्याची महाराष्ट्र शासनाची पथदर्शी व महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने ३ हजार ४५० मीटर लांबीचे
मातीचे धरण बांधून ८ हजार ९६० मीटरच्या मुख्य वळण बोगद्याद्वारे तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविले. या प्रकल्पाचे ९५ टक्के काम आजमितीस पूर्ण झाले आहे. गतवर्षीच्या हंगामात घळभरणी होवून चालू वर्षात पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडूनही मुबलक पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात यश आले आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले. नाशिक महानगरपालिकेच्या स्मार्ट शाळा अभियान या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत नविन तंत्रज्ञानावर आधारित शिक्षकांचा कौशल्य विकास, शालेय पायाभूत सुविधांचा पूनर्विकास, शाळांमध्ये इनोव्हेशन लॅब, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुषंगाने सहकार्य, आयटीने शाळेचा परिसर सक्षम करणे, स्मार्ट स्कुल कॅम्पस, डिजिटल ग्रंथालय व ई-स्कूल आदी उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
‘दोनवर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या मोहिमेंतर्गत नाशिक विभागीय माहिती कार्यालयाने शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून उद्घाटन झालेले हे प्रदर्शन ५ मे पर्यंत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार असून त्याचा नागरिकांनी लाभ जरूर घ्यावा, असे आवाहन ही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
यांचा झाला सन्मान…
आदर्श तलाठी : श्री. वसंत आर. धुमसे
ॲन्टी करप्शन ब्युरो विभागातील प्रशंसनीय सेवेसाठी झाला सन्मान
क्र. पोलीस अधिकारी/अमलदार पदनाम
1 श्री. नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक
2 श्री. पंकज पळशीकर पोलीस हवालदार
3 श्री. एकनाथ बाविस्कर पोलीस हवालदार
4 श्री. प्रकाश महाजन पोलीस नाईक
पोलीस महासंचालक यांच्या सन्मान चिन्हाने सन्मानीत झालेले सन्मानार्थी
क्र. पोलीस अधिकारी/अमलदार पदनाम
1 डॉ. श्री. अंचल मुदगल पोलीस निरीक्षक
2 डॉ. श्री. श्रीकांत निंबाळकर पोलीस निरीक्षक
3 श्री. संतोष जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक
4 श्री. बाळु लभडे पोलीस हवालदार
5 श्री. नितीन संधान पोलीस हवालदार
6 श्री. रविंद्रकुमार पानरसे पोलीस हवालदार
7 श्री. सुनिल कुलकर्णी पोलीस हवालदार
8 श्री. राहुल जगझाप पोलीस नाईक
9 श्री. यतीनकुमार पवार पोलीस नाईक
10 श्री. इम्रानीद्दीन मुल्ला पोलीस नाईक
11 श्री. दशरथ पागी पोलीस नाईक
12 श्रीमती अश्विनी देवरे पोलीस नाईक
13 श्री. भालचंद्र खैरनार पोलीस नाईक
14 श्री. प्रविण वाघमारे पोलीस नाईक