इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकमधील युनायटेड वी स्टँड फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित केले आहे. संस्थेने एकूण १५२१ मोफत तिकिटांचे वितरण केले असून, चित्रपटाच्या सहा शोज ची व्यवस्था करण्यात आली होती. युनायटेड वी स्टँड फाउंडेशन मागील १० वर्षांपासून महाराष्ट्रात कार्यरत असलेली युवा संघटना आहे, जी भारतीय लष्कर सोबत विविध गोष्टीत कार्य करते. छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो जगभरात प्रदर्शित करण्यात आलेला आहे.
चित्रपटात विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तसेच छत्रपती संभाजी महाराजांची मुघलांविरुद्धची हिंदवी स्वराज्यासाठीची लढाई दर्शवली गेली आहे. संस्थेच्या या उपक्रमाचा उद्देश म्हणजे लोकांना संभाजी महाराजांच्या बलिदानाची जाणीव करून देणे आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची ओळख करून देणे आहे आणि, आता च्या पिढीने पाश्चिमात्य संस्कृती अंगिकरण्या पेक्षा थोर महापुरुषांचे गुण अंगीकारणे गरजेचे असून, ते केल्यानेच आपला देश जगाच्या नकाशावर उठून दिसेल असे मत संस्थेचे अध्यक्ष सागर मटाले यांनी व्यक्त केले.
संस्थेने यापूर्वीही अशा मोफत चित्रपट प्रदर्शनांचे आयोजन केले आहे, ज्यामुळे लोकांना योद्ध्यांच्या त्यागाची माहिती मिळावी.छावा चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, विकी कौशल यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. युनायटेड वी स्टँड फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे नाशिकमधील नागरिकांना संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट मोफत पाहण्याची संधी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांच्या बलिदानाची जाणीव अधिक व्यापकपणे पोहोचेल आणि या पुढें देखील आपल्या संस्थेचा वतीने असे शोज आयोजित केले जातील अशी खात्री संस्थेचे अध्यक्ष सागर मटाले यांनी दिली आहे.