इंडिया दर्पण विशेष
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर!
नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील पहिले मंदिर आहे याची अनेकांना माहितीच नाही. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सतत उदो उदो करणार्या अनेक शिवाजी महाराजांच्या भक्तांना आणि शिवप्रेमींना देखील पंचवटीतील दिंडोरी रोडवर मखमलाबाद येथे पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या स्नेह नगर मधील या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची माहिती नाही. किंवा असली तरी त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले दिसत नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि दुसरे मंदिर नाशिकला.
प.पू.विष्णु महाराज पारनेरकर यांच्या संकल्पनेतून दिनांक १९ जानेवारी २००२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील पहिले मंदिर नाशिक येथे दिंडोरी रोडवरील स्नेह नगर येथे स्थापन करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या १६० परिचितांना आम्ही पंचवटी बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर दाखविले. सर्वांनी या आगळावेगळया वैशिष्ट्याचे कौतुक केले. नाशिकचे हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर नावारूपाला यावे त्याचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कौतुक व्हावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी असणार्या सर्व नाशिकरांना वाटते.
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्तानं नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी नगरसेवक आणि नाशिककरांनी मनावर घेतलं तर नाशिक मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा महाराष्ट्रभर जयघोष करता येईल.
Chhatrapati Shivaji Maharaj Temple Nashik