इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नृत्यांगना गौतमी पाटील ही सध्याची अत्यंत लोकप्रिय कलाकार आहे. तिचे जवळपास सगळेच कार्यक्रम हाऊसफुल जातात. तिच्या कार्यक्रमांना क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होते. तिच्या नृत्याच्या एकूण शैलीमुळे तिच्यावर नेहमीच टीका होत असते. गौतमीची नृत्यशैली ही लावणीसारखी नसल्याची टीका लावणी कलाकार नेहमीच करत असतात. आता तिच्या आडनावावरून नवीन वाद सुरू झाला आहे. काही मराठा संघटनांनी तिच्या आडनावाला आक्षेप घेतला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिची पाठराखण केली आहे.
मराठा संघटनांचा आक्षेप
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर राज्यात नवा वाद सुरू झाला. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव वापरु नये अशी या संघटनांची भूमिका आहे. या प्रकरणावर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कलाकारांना संरक्षण देण्याची भूमिका मांडली आहे.
काय म्हणतात संभाजीराजे?
महिलांचे गुण आणि कर्तृत्वाचा आदर करायला हवा. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. पाटील हे आडनाव ही काही मराठा समाजाची मक्तेदारी नाही. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोक सुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे, असे संभाजीराजे सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील महिलांना संरक्षण दिले. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. फक्त महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे.
नव्या संसदभवन सोहळ्यावरून संभाजीराजेंची टीका
नवीन संसद उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांबरोबर राष्ट्रपती उपस्थित राहिल्या असत्या तर कार्यक्रमाची शान, महत्त्व वाढले असते, असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.
संभाजीराजे यांची सरकारवर टीका
राज्यात सध्या खालच्या पातळीवर राजकारण सुरू असल्याची खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली. खोके बोके मांजर डुकरे कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र घडावा ही लोकांची अपेक्षा असून स्वराज्य संघटना हा दुरावा भरून काढणार असल्याचा विश्वास छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केला आहे. देशातील इतर राज्यांमध्ये जातीवर राजकारण केलं जातं, मात्र तो प्रकार महाराष्ट्रात होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Chhatrapati sambhajiraje on Gautami Patil