मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षण प्रश्री मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यांच्यात काही कारणांवरून बेबनाव निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. कारण छत्रपती संभाजी राजे यांनी काही कार्यकर्त्यांना बोलू नका, असे सांगितले होते. त्यामुळे नाराजीचा सूर असल्याचे सांगण्यात येते त्यानंतर या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केल्याने आता छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले की यापुढे कोणत्याही बैठकीत सर्वजण बोलला मी बोलणार नाही मी निघून जाईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे.
संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत असतात. मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी आमरण उपोषणही केलं होतं. तेव्हा तत्कालिन नगरविकास एकनाथ शिंदे यांनी भेट घेत त्यांच्या मागण्या ऐकल्या होत्या. त्यावर शिंदे आता मुख्यमंत्री झाल्यावर नियुक्त्यांचा विषय मार्गी लागला. त्यामुळे मराठा समाजाच्या याच मागण्यांकरिता त्यांनी बैठक बोलाविली होती. यावेळी काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिष्टाचार पाळला नाही, त्यावर संभाजीराजे नाराज झाले. आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही नाराजी व्यक्त केली.
साहजिकच छत्रपती संभाजी राजे यांनी उद्विग्न होत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा एकमेकांवरच पातळी सोडून वैयक्तिक टिप्पणी, मी शांततेचे आवाहन केलं. पण हे वारंवार होत राहिलं तर अशा पातळीहीन बैठकीतून मीच बाहेर जातो, तुमचं चालु द्या ,अशी भूमिका मला घ्यावी लागेल, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या व त्याकरिता आझाद मैदान येथे मी आमरण उपोषणही केले होते.
तत्कालीन नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन जी आश्वासने दिली होती, ती आता मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारीने पूर्ण करावीत, असे निवेदन मी त्यांना दिले होते. नियुक्त्यांचा विषय मार्गी लागला, हे त्या उपोषणाचेच यश आहे. समाजाच्या याच मागण्यांकरिता त्यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत सारथी संस्थेची स्वायत्तता, समाजासाठी अनेक योजना असे विषय मार्गी लागले. मात्र या बैठकीत काही लोकांनी शिष्टाचार पाळला नाही. मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काही जणांनी भर बैठकीत एकमेकांवरच पातळी सोडून वैयक्तिक टिप्पणी केल्याने मी शांततेचे आवाहन केले.
मात्र हा प्रकार वारंवार होत राहिल्याने समाजाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा तुमचं हेच चालू राहणार असेल, तर अशा पातळीहीन बैठकीत बसण्यापेक्षा मीच बाहेर जातो, तुमचं चालुद्या ; अशी भूमिका मला घ्यावी लागली. मी कधीही कुणाचा आवाज दाबणे शक्य नाही, पण समाजाच्या नावाने उभे राहत असताना पातळीहीन वागून कुणी समाजाची नाचक्की करणार असेल, तर ते देखील मी सहन करू शकत नाही.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी काही आज आलेलो नाही. २००७ पासून मी या चळवळीत पूर्णतः सक्रिय आहे. माझा राजवाडा, घरदार सोडून, वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी महिनो महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो. संसदेत सुद्धा मराठा आरक्षणावर बोलणारा मी पहिला आणि कित्येक वर्षे एकमेव खासदार होतो. संसदेच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा मी एकमेव व्यक्ती आहे.
सन २०१७ साली मुंबई येथे मोर्चाचा स्टेजवर जाऊन समाजाला दिशा दिली, यामुळे आपले मोठे राजकीय नुकसान होणार याची कल्पना असूनही स्वतःपेक्षा समाजाचा विचार केला. आरक्षण रद्द झाल्यानंतर कित्येकांनी समाजाला हिंसक मार्गाला घेऊन जाऊन राजकीय स्वार्थ साधण्याची रणनीती आखली होती. मात्र तेव्हा समाजाला वस्तुस्थिती दाखवून सनदशीर मार्गाने हा लढा पुढे नेला. समाजानेही नेहमीच मला प्रेम दिले, पाठबळ दिले.
https://www.facebook.com/100044614891340/posts/pfbid0gdDrDFQuB8MiPz9vS6X7F5MJHDn3x25Frkv6vTcVGvhR2crqo4d3T3auQH2qcDejl/?d=n&mibextid=cwv5hk
कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेला मराठा क्रांती मोर्चा हा सध्या काही जणांनी कुठे नेऊन ठेवलाय, हे समाज उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. वेगवेगळ्या पक्षांशी व नेत्यांशी संधान बांधून अनेकांनी वैयक्तिक स्वार्थ साधून घेतले. पाठीशी काहीही कार्यकर्ते अथवा संघटनात्मक ताकद नसताना देखील केवळ समाजाच्या नावावर आपल्या पोळ्या भाजल्या. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील कित्येक राजकीय नेत्यांनी देखील जाणीवपूर्वक अशा लोकांना खतपाणी घातले व आजही घालत आहेत. पण समाज डोळस आहे. फार काळ समाजाला असे फसवू शकत नाही.
मराठा समाजाला कायद्याच्या कक्षेत टिकणारे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मी गेले दीड दशक सर्व स्तरांवर लढा देत आहे. मग ते कसे द्यायचे हा सरकारचा विषय आहे. समाजासाठी कोणतीही मागणी करण्यास कुणालाही आमचा विरोध नाही व पुढेही असणार नाही. पण आपली मागणी करत असताना आरक्षण नेमके मिळवणार कसे, तेदेखील समाजाला सांगितले पाहिजे. केवळ आपले महत्त्व राखण्यासाठी समाजाची दिशाभूल करू नये.
कोणतेही आरक्षण द्यायचे असल्यास आणि ते न्यायालयात टिकवायचे असल्यास मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करावेच लागेल, हे सत्यच आहे आणि ते कुणीही नाकारू शकत नाही. एकदा मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सरकारला मराठा समाजाला आरक्षण हे द्यावेच लागेल आणि न्यायालयात सुद्धा ते टिकेल. पण हे सत्य न सांगता अधांतरी एखादी मागणी करून कुणीही समाजाचे नुकसान करू नये.
फेसबुकवर लिहिणारे आणि मीडियावर बोलणारे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले काल आलेले मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे. शेतशिवारात राबणारा शेतकरी, विविध क्षेत्रांत मेहनतीने काम करणारा कष्टकरी, देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी आणि या सर्वांचे पालनपोषण करणाऱ्या माझ्या माता भगिनी म्हणजे माझा मराठा समाज आहे. पंधरा वर्षे मी त्यांच्यासोबत राहून, तळागाळात काम करून, समाजासाठी लढा देऊन, स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा नेहमीच समाजाच्या भल्याचा प्रथम विचार करून त्यांचा विश्वास, प्रेम आणि पाठबळ कमावले आहे, ते कुठल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे कमी होणार नाही. माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवलो नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे समाजाचा एक सेवक म्हणूनच कार्यरत राहिलो व यापुढेही राहीन. समाजासाठीचा माझा हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील.
https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1563487145473753095?s=20&t=A1Aj0n0IW8ufS57C8Sll8w
Chhatrapati Sambhajiraje Announcement Maratha Demand Meets
Maratha Reservation Maratha Kranti Morcha Dispute Sarathi MeetingStand Politics