छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान आवास योजनेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छत्रपती संभाजीनगरातील नऊ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान आवास योजनेत ४०० कोटींपेक्षाहून अधिकचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची कागदपत्रे संक्तवसुली संचालनालयाने दोन आठवड्यांपूर्वी ताब्यात घेतली होती. महापालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच एकाच आयपी ॲड्रेसवरून निविदा भरल्याचं देखील अलिकडेच उघडकीस आलं आहे.
४० हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यहार झाल्याचे धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी एकाच व्यक्तीला सर्व प्रकारची कंत्राटं दिली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ईडीद्वारे कारवाई सुरू आहे. या अंतर्गत एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या गैरव्यहारात काही मोठे नेते सहभागी असल्याचेही सांगण्यात येत आहे. संबंधित कंत्राटदाराचे घर, एक रुग्णालय आणि इतर ७ ठिकाणी ईडीने छापेमार कारवाई झाली आहे.
राज्यभर कारवाईचा धडाका
ईडीने सध्या वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यानंतर नागपूरात दामदुप्पटचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना गंडा घालणाऱ्यांविरुद्ध छापेमार कारवाई झाली होती. त्यामध्ये सोने, हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम सापडली होती. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई झाली अहे. मात्र, या कारवाईदरम्यान ईडीने जप्त केलेल्या बाबींचा तपशील कळू शकला नाही.
Chhatrapati Sambhajinagar ED raid 9 places