इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. काही तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीला पित्याने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून सोमवारी रात्री विहिरीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह पाहिला. हा प्रकार त्या निर्दयी बापालाही कळला. त्यानंतर त्याने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. आणि जवळच खड्डा खणून मृतदेह पुरला. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपी वडिलांना अटक केली. मात्र, अद्यापपर्यंत आरोपीने मुलीच्या हत्येचे कारण सांगितलेले नाही.
उदयपूर पोलीस स्टेशन हद्दीतील झिरमिटी धौरापारा गावातील रहिवासी यशवंत याची पत्नी रंगीला हिने सोमवारी दुपारी एका मुलीला जन्म दिला. ही मुलगी जोडप्याचे चौथी अपत्य होती. आईच्या शेजारी झोपलेल्या मुलीला रात्री अकराच्या सुमारास उचलून यशवंतने प्लास्टिकच्या पिशवीत बांधले, असा आरोप आहे. यादरम्यान नवजात बालक रडायला लागले, मात्र यशवंतने लक्ष दिले नाही. घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीजवळ तो गेला आणि त्याने नवजात बाळाला पिशवीसह विहीरीत फेकले. त्यानंतर घरी येऊन तो झोपी गेला. काहीच झाले नाही असे त्याने दाखवले.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी पोहोचले असता त्यांना विहिरीत प्लास्टिकची पिशवी तरंगताना दिसली. यानंतर तेथे लोकांची गर्दी झाली. हा प्रकार यशवंतला समजताच तोही घटनास्थळी पोहोचले. त्याने मृत मुलीला विहिरीतून बाहेर काढले आणि जवळच खड्डा खणून मृतदेह पुरला. हे पाहून लोकांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे त्याने सांगितले. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच उदयपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक समरेंद्र सिंह, कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार एजाज हाश्मी, फॉरेन्सिक तज्ज्ञ कुलदीप कुजूर यांच्यासह डॉक्टर प्रीती पाईक्रा आणि डॉ. नेहा भगत घटनास्थळी पोहोचले. नवजात अर्भकाचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची अनेकदा चौकशी केली, मात्र मुलीच्या हत्येचे कारण त्याने सांगितलेले नाही. या जोडप्याला आधीच तीन मुले आहेत, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बापाच्या या क्रूर कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
Chhatisrgarh Crime Father Killed Infant Girl