नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभरात गाव तिथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद हे अभियान हाती घेऊन ते यशस्वीपणे राबविण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केल्या.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत नुकतेच फेरबदल करण्यात आले असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, ऍड.सुभाष राऊत, प्रा. दिवाकर गमे, तुकाराम बिडकर, आंबदास गारूडकर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यभरात क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी करण्यात यावी. तसेच दि.६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शतकोत्तर रौप्य स्मृती वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊन महापुरुषांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत रुजविण्यास यावे अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
ते म्हणाले की, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या जिल्ह्यात जिल्हा ,तालुका कार्यकारिणी तयार करावी. तसेच महिलांसाठी स्वतंत्र कार्यकारिणी निर्माण करण्यात येऊन राज्यभरात समता सैनिकांचे संघटन मजबूत करण्यात यावे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गावपातळीवर विविध सामाजिक उपक्रम राबवित प्रत्येक गावात समता परिषद संघटना अधिक मजबूत करण्यात यावी. यासाठी राज्यभरात गाव तिथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात यावे. आरक्षणाच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येऊन बहुजन समाजातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास भर देण्यात यावा अशा विविध सूचना त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या.