पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिन दलितांच्या उद्धारासाठी शिक्षण हे एकमेव असे शस्त्र आहे असे सांगत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भावराव पाटील, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्यासह ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांची पूजा करा, सरस्वतीने किती शाळा काढल्या, किती जणांना शिकवलं, सरस्वती कुठून आली, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता भूमी फुले वाडा पुणे येथे आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते कवी प्रा.डॉ.यशवंत मनोहर यांचा ‘समता पुरस्कारा’ने तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचा ‘सत्यशोधक पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रा.हरी नरके, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, जयदेव गायकवाड, पांडुरंग अभंग, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरीताई धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रा.दिवाकर गमे, तुकाराम बिडकर, अंबादास गारुडकर, पार्वतीबाई शिरसाट, अनिता देवतकर, प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, डॉ.शेफाली भुजबळ, वैष्णवी सातव, मनीषा लडकत यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा प्रश्न असेल तसेच पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा यासाठी खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. अद्यापही फुलेवाडा विस्तारीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तेथील रहिवाश्यांच्या स्थलांतराचा प्रश्न अद्याप बाकी आहे. तसेच भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या महिला शाळेच्या ठिकाणी ‘सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा’ सुरू करून त्या रूपाने राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झालेली आहे. याबाबत लवकरच सर्वांना एकत्रित आणून बैठक घेऊन निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अन्यथा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी १ जानेवारी पर्यन्त हा प्रश्न मार्गी लागला नाही तर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात आपण सहकुटुंब सहभागी होऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, अनेक वर्षापासूनचा आपला आग्रह होता की मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्यात यावे. ती मागणी पूर्ण झाली आणि महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधत या दोनही महापुरुषांच्या तैलचित्रांचे मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर अनावरण करण्यात आले. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार त्यांनी मानले. तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविणे असा किंवा नाव सहजासहजी कधीही लागत नाही. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. तो केल्यानंतरही कधी कधी ते काम होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ते म्हणाले की, प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्यावर विविध साहित्य लिहिलं. समाजाला दिशा देण्यासाठी त्यांच हे साहित्य अतिशय महत्वपूर्ण असून एक गांव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी यशस्वीपणे पुढे नेली. तसेच नेहमीच त्यांनी संविधानाचा जागर केला असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना प्रा.डॉ.यशवंत मनोहर म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी समितीचे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची कृतज्ञता व्यक्त करतो. मी तुमच्यातला माणूस आहे, तुमचा प्रतिनिधी आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने पुरस्कार मिळतो याचा आनंद काय असतो ही आता सांगता येणार नाही. महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे आपले मायबाप आहे. समाजसुधारकांचे मृत्यू सर्वांना अमान्य आहे. हे लोक कधीही मरत नाही. स्व:ला माणूस म्हणून लढण्याच्या लढाया जोपर्यन्त सुरू आहे तोपर्यन्त महात्मा फुले जिवंत आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की, मी काय लिहाव याचे सूत्र मला महात्मा फुले यांनी दिलं. खर सत्य निर्माण करण्यासाठी माणूस निर्माण करण्यासाठी लिहिण्याची प्रेरणा त्यांनी दिली. हा देश मंदिर आहे आणि माणूस हा एक महानायक आहे. त्यामुळे आपल्याला माणूस निर्माण करायचा आहे. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा मी माणूस असून या विचारांच्या बाहेर काम करणाऱ्यांकडून मी कुठलाही पुरस्कार मी स्वीकारणार नाही. कारण ते स्वीकारलेल्या तत्वांना मारक आहे. आपण भारताचे, भारतीय परंपरेचे लोक आहोत. फुले, शाहू, आंबेडकर आणि संविधान या विचारांवर काम करणारे राज्य आणि देश आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी माणूस म्हणून एकत्र यायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव म्हणाले की, सततच्या पाठपुराव्यानंतर सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला दिले गेलं. मात्र ज्या भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या शाळेच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. तसेच पुण्यातील मजूर अड्यावर मजूरभवन स्मारक निर्माण करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत शासनाने १ जानेवारी २०२३ पर्यंत या स्मारकाबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाहीतर सत्याग्रह आंदोलनास सुरुवात करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
ते म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिलेला पुरस्कार हा लाखाचा नाही तर लाखमोलाचा आहे. कारण फुले, शाहू, आंबेडकरांच्या लढाईतील आम्ही सैनिक आहोत. विचारांची ही लढाई अविरत सुरू राहील. केवळ घोषणापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर द्या असे आवाहन त्यांनी करत एक गाव एक पाणवठा चळवळीत यशवंत मनोहर यांचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले यांचा फोटो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात समाविष्ट करा – प्रा.हरी नरके
यावेळी प्रा.हरी नरके म्हणाले की, छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्याने पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. मात्र अद्यापही विद्यापीठाच्या बोधचिन्हात त्यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यापीठाने विद्यापीठाच्या बोधचिन्हात सावित्रीबाई फुले यांचा फोटो समाविष्ट करावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यास क्रमात समाविष्ट केले. तो विषय ऐच्छिक आहे. त्याला आपला विरोध नाही परंतु सिनेट नसतांना आणि प्रभारी कुलगुरुना त्याचा कुठलाही अधिकार नसताना हा निर्णय घेतला गेला हे सर्व संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपलीताई चाकणकर म्हणाल्या की, समता भूमीवरून जाताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार घेऊन जाताना समाजातील असलेली सनातनी वृत्ती नाहीसी करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच मनुवादी वृत्तीला आमचा कायम विरोध असून मनुवादी वृत्तीची बंधने आम्हाला कदापी मान्य नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी प्रा.हरी नरके यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू भुजबळ यांनी सूत्रसंचालन डॉ.नागेश गवळी यांनी केले. तर आभार प्रदर्शन पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी केले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरीताई धाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Chhagan Bhujbal on Sarasvati Controversial Statement