मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.
छगन भुजबळ यांच्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेने वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याकरिता शासनाने दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली आणि दि. ०५ एप्रिल २०२१ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. या प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी रक्कम रु. ६२७.६२ कोटी चा प्रस्ताव कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी दि. २९ मार्च २०२२ रोजी त्रुटींची पूर्तता करून शासनाला सादर केलेला आहे. दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या उच्चस्तर समिती बैठकीमध्ये या विषयाला मंजुरी मिळालेली आहे. मात्र या प्रकल्पाच्या इमारत बांधकामाची प्रशासकीय मान्यता शासन स्तरावर प्रलंबित आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून नाशिक येथील विविध ७ विषयांमध्ये महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरु करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यक परिषदेने मान्यता दिलेली असून जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे दि. ०९ एप्रिल २०२२ रोजी पदव्युत्तर वैद्यकीय विभाग स्थापन करण्यात आला आहे. या पदव्युत्तर संस्थेसाठी अधिष्ठाता यांची दि. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी नेमणूक करण्यात आली असून इतर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांच्या सुद्धा माहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जवळपास १५ विषयांमध्ये वर्ष निहाय ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ पासून १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या इमारतीमध्ये सद्यस्थितीत सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.
या मेडिकल कॅम्पससाठी अधिकच्या जागेची आवश्यकता असल्यामुळे विद्यापीठाला लागून असलेली म्हसरूळ येथील गट नं. २५७ चे क्षेत्र १४ हे ३१ आर ही नाशिक महानगरपालिकेची जागा आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याकरिता भुजबळांच्या प्रयत्नातून नाशिक महानगरपालिकेचा ठराव करण्यात आला. दि.२५ नोव्हेंबर २०२१ रोजी ही जागा वैद्यकीय महाविद्यालयास देण्याकरिता नगरविकास विभागाने मान्यता दिली. मात्र या जागेचे मुल्यांकन २० कोटी ३ लाख ४० हजार म्हणजे ५० लाखापेक्षा अधिक असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांपर्यंत दि. १२ मे २०२२ रोजी महसूल विभागाला प्रस्ताव सादर केला असून सदर प्रस्ताव महसूल विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. ही जागा लवकरात लवकर आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आहे.
या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी आणि बांधकामासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्याकरिता मंजुरी मिळण्यासाठीचा प्रस्तावाला दि. ०५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तर समितीने मान्यता देवूनही सुद्धा या कामाच्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकास लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता द्यावी यासाठी भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांना पत्र दिले आहे.
या ठिकाणी केवळ वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय नव्हे तर हे कॅम्पस मेडिकल क्षेत्रातील आगळे वेगळे कॅम्पस करण्यासाठी भुजबळांनी या प्रकल्पासाठी जास्तीची जागा मिळवून दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सुसज्ज रुग्णालय,पीजी इन्स्टिट्यूट सोबतच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय,शासकीय युनानी महाविद्यालय,शासकीय फिजिओथेरपी महाविद्यालय आणि या पॅथीशी संलग्न रुग्णालये निर्माण होऊन भविष्यात हा कॅम्पस देशातील वैद्यकीय क्षेत्राची एक वेगळी ओळख निर्माण करेल.
Chhagan Bhujbal Letter to CM DYCM and Girish Mahajan