नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मांजरपाडा धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरणासाठी मंजूर निधी २४२ कोटी असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी कालव्याचे जलपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नांदूरमध्यमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे, सरपंच दत्तुपंत डुकरे, दत्तुकाका रायते, माजी जि. प. सदस्य भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्र्वर जगताप, बाळासाहेब गुंड, माजी प.स. सदस्य नवनाथ काळे, मोहन शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ते यावेळी म्हणाले, या कालव्याच्या अस्तरीकरण कामामुळे अतिशय कमी वेळात दरसवाडी ते डोंगरगाव ८८ किलोमीटर पैकी ६३ किलोमीटर नगरसुल शिवारपर्यंत पाणी पोहचले आहे. ९० क्युसेस वेगाने पाणी कालव्यातून सोडण्यात आले असून लवकरच पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचून बंधारे भरण्यास सुरुवात होईल. येणाऱ्या काळात दरसवाडी धरणात येणाऱ्या सांडव्याची उंची वाढविण्यात येईल त्याचप्रमाणे कालवा परिसरातील शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार रस्ते व पुलांची कामेही त्वरीतच मार्गी लावली जाणार असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी ग्रामस्थांना अश्वस्थ केले.