पिंपरी चिंचवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापुरुषांची बदनामी महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात जो जो उभा राहील तो आपला आहे आणि त्यांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयोजित एक दिवसीय शिबिराला त्यांनी उपस्थिती लावली यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की या फुले शाहु आंबेडकरांच्या राज्यात वारंवार महापुरुषांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून वारंवार महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम यांचे चालू आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापुरुषांनी भीक मागितली असे विधान केले मात्र त्यांना ठाऊक नसेल १८६९ साली टाटा उद्योग समूहाचा वार्षिक उलाढालीचा आकडा हा २० हजार होता. तर पूना कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टींग या कंपनीचा वार्षिक उलाढालीचा आकडा होता २१ हजार रुपये आणि या कंपनीचे सर्वेसर्वा होते महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले स्वत: उद्योगपती होते मोठमोठी कामे ते करत असत. आणि त्यातून मिळालेल्या पैश्याने त्यांनी समाजसुधारणेचे काम केले. लोकमान्य टिळकांना एका खटल्यातून सोडवण्यासाठी रूपये १०,००० इतकी रक्कम महात्मा फुले यांनी दिली होती.
कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोर शिकविल आणि या सनातन्यांच्या छाताडावर थयाथया नाचविल कर्मवीरांनी तर शिक्षणाच्या कामासाठी स्वताच्या पत्नीचे दागिने विकले पण मुलांना शिकवीले
राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जायला लागले आहेत. मागील सहा महिन्यांपासून राज्याच नकारात्मक वातावरण. .सुरुवातीच्या काळात दहीहंड्या फोडण्यात मग्न झालेल्या या सरकारने आता नवस फेडण्यासाठी दौरे सुरू केले आहे, अशा राज्यात कोणते उद्योगपती थांबतील? केंद्र सरकारने सुरू केलेले, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया हे सगळे प्रकल्प अयशस्वी ठरले त्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.महाराष्ट्रातून लाखो कोटी रुपयाचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला काहीही दिले जात नाही अशी खंत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. बेळगाव – महाराष्ट्र प्रश्नांवर हे सरकार गप्प राहते तिकडचे मुख्यमंत्री दम देतात आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री गप बसतात. पवार साहेब आणि मी बेळगाव साठी लाठ्या काठ्या खाल्या आहेत. हा महाराष्ट्र आहे हे दाखवून द्यायला हवे असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले …..
यावेळी बोलताना ते म्हणाले की उद्या शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम आपण सर्वांनी शिर्डीच्या शिबीरात पाहिले आहे. आजारी असताना देखील शिबीराला उपस्थिती लावली होती. आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार रहावं लागणार आहे. राज्यातील महापालिका किंवा जिल्हापरिषदांच्या निवडणुका कधीही घोषित होतील… पवार साहेबांना वाढदिवसाचे काही भेट द्यायची असेल तर निवडणुकींच्या माध्यमातुन त्यांना बळ द्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.