नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही. मराठा समाजाचे लोक आता मोकळेपणाने राहतील, कुठेही दडपण येणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांना माघार घेण्याचे आवाहन केले. एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
यावेळी भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाचे ६० ते ७० टक्के उमेदवार आहेत. जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे. दलित आणि मुस्लिम उमेदवारांची यादी न आल्याने निर्णय़ घेतल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांनी बोलल्यावर मी काय बोलणार, सर्व धर्मीय आणि सर्व समाजाचा पाठींबा हवा आहे हेच यातून ध्वनित होते. राजकीय पक्षाचा प्रयत्न असाच असतो की, सर्व धर्मीय आणि सर्व समाजामध्ये काम करणे आणि त्यातून निवडून येणे हेच सर्व पक्ष करत असतात.