नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील, पोलिस स्टेशन कार्यालयात तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावे. पूरपरिस्थितीत अडकलेले नागरिक तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावे असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दूरध्वनी द्वारे दिले आहेत.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपला मुंबई दौरा रद्द करत येवला मतदारसंघात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे.
मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीवर लक्ष ठेऊन असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस स्टेशन पंचायत समिती सर्व ठिकाणी तत्काळ नियंत्रण कक्ष सुरू करावा अशा सूचना केल्या आहेत. तसेच मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांक सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रात जनतेसाठी तात्काळ प्रसिद्ध करावेत पूर परिस्थितीत काही तात्पुरती बेटे निर्माण झालेली आहे. अशा ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना तात्काळ सुटका करावीत. आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ पथकांची मदत घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
तसेच पूरग्रस्त भागात बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मोफत धान्य तसेच मदतीची रक्कम तात्काळ वाटप सुरू करावे. पूर परिस्थितीने बाधित झालेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करावे. ज्या ठिकाणी जीवित हानी पशुहानी झालेली आहे, त्या ठिकाणी तात्काळ मदत देण्याची कार्यवाही सुरू करावी जखमी व्यक्तींना सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवावे अशा सूचना केल्या आहे.
त्याचबरोबर शेती पिकांचे, घरांचे तसेच पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे तात्काळ सुरू करण्यात यावेत. सर्व शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा,औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध ठेवावा. जीवनावश्यक सेवा, दूरध्वनी सेवा, खराब झालेले रस्ते, विद्युत सेवा तात्काळ पूर्ववत व्यवस्थित सुरू करणे बद्दल संबंधित विभागांनी कार्यवाही करावी.आपत्कालीन सेवेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा तात्काळ रद्द कराव्यात. सोमवारी लहान मुलांच्या शाळा तसेच अंगणवाड्या यांना आवश्यकता असल्यास सुट्ट्या जाहीर कराव्यात तसेच जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा धरणांचा जिल्हा असल्यामुळे धरणांमधील विसर्ग त्यामधून होणारा पाण्याचा प्रवाह व त्यामुळे बाधित होणारी गावे काठावरील कुटुंबे यांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे असेही निर्देश त्यांनी दिले आहे.