नवी दिल्ली – राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाच्या वडलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भावनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पहिले काही दिवस त्यांनी उपचारांना योग्य प्रतिसाद दिला. मात्र नंतर त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज दुपारी त्यांचे निधन झाले.
चेतन साकरियाने यंदाच्या साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने ३ फलंदाजांना बाद करुन धडाकेबाज एन्ट्री केल्यामुळे त्यांचे नावही झाले. एकुण सहा सामन्यांत त्याने उत्तम गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सने फेब्रुवारीत झालेल्या लिलावात १ कोटी २० लाख रुपये दिले. आयपीएलमधून मिळालेला हे सगळे पैसे चेतन वडिलांच्या उपचारावर खर्च करण्याच्या तयारीत होता. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
काही दिवसांपूर्वी चेतनच्या भावाने आत्महत्या केली होती. तर आज वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. भावाच्या निधनानंतर चेतनला जबर धक्का बसला होता. त्यानंतर हा दुसरा धक्का बसला आहे. साधारण कौटुंबिय पार्श्वभूमी असलेला चेतनकडे पाच वर्षापूर्वी घरात टीव्ही सुध्दा नव्हता. त्याचे वडील टेम्पोचालक होते. पण, त्याने क्रीकेटमध्ये नाव कमावून सर्व आर्थिक चित्र बदलले होते.