नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रेप्को बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २२.९० कोटी रुपये लाभांशाचा धनादेश केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे नवी दिल्ली येथे सुपूर्द केला. यावेळी अमित शाह यांनी बँकेच्या चमूचे १४० कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावल्याबद्दल अभिनंदन केले. हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठा नफा आहे.
अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, “गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील रेप्को बँकेने कार्यक्षमतेचा, समर्पणाचा आणि व्यावसायिकतेचा आदर्श निर्माण केला असून, तो संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”
हा धनादेश रेप्को बँकेचे अध्यक्ष ई. संथानम, रेप्को बँक संचालक व रेप्को होम फायनान्स लिमिटेडचे अध्यक्ष सी. थंगराजू आणि व्यवस्थापकीय संचालक ओ.एम. गोकुल यांच्या हस्ते सादर करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आणि सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव डॉ. राजेंद्र कुमार उपस्थित होते.
रेप्को बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात १४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून ३० टक्के लाभांश वितरित केला आहे, जो सहकारी संस्थेच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. रेप्को बँक ही भारत सरकारच्या मालकीची संस्था असून भारत सरकारचा या बँकेत ५०.०८ टक्के हिस्सा आहे. बँक गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करते. ही संस्था सलग तीन दशकांपासून नफा कमावत आहे आणि दरवर्षी लाभांश जाहीर करत आहे.